पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी घाई नको

0

पुणे । पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प विकासाच्यादृष्टीने योग्य आहे. परंतु, शासनाने शेतकर्‍यांची जमीन संपादित करताना घाई करणे योग्य नव्हे. सध्याच्या बाजारभावानुसार जमीनीला चारपट दर शेतकर्‍यांना मिळाला पाहिजे. याबाबत स्थानिक शेतकर्‍यांची मते विचारात घेणेही गरजेचे आहे. शासनाने प्रथम पुरंदर मधील शेतकर्‍यांशी थेट संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घ्यावी. एकाही शेतकर्‍यावर अन्याय होता कामा नये. मी स्वतः स्थानिक भागातील शेतकर्‍यांची संवाद साधून चर्चा करणार आहे, त्यानंतरच विमानतळाचा निर्णय जाहीर केला जाईल, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्पष्ट केले.

सर्व शेतकर्‍यांना एकच भाव द्या
पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार बोलत होते. प्रस्तावीत विमानतळ प्रकल्पाबाबत पवार म्हणाले, शेतकर्‍यांना शासनाने प्रथम विश्‍वासात घ्यावे. विमानतळाकरिता सर्व बाजुकडील रस्त्यांचे चौपदरीकरण, सहापदरीकरण करावे लागणार आहे. त्यामुळे जो भाव प्रकल्प अंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांना दिला जाईल तोच भाव रस्त्यांसाठी जमीन जाणार्‍या शेतकर्‍यांनाही मिळणे आवश्यक आहे. महसूल विभागाने तालुक्याच्या पूर्व भागातील या शेतकर्‍यांच्या 7/12 उतारावर सरसकट जिराईत, अशी केलेली नोंद अव्यवहार्य असल्याचे पवार म्हणाले.

मोदींची राजकीय पातळी खालावली
पंतप्रधान मोदी यांच्याबाबत पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षावर टीका करणे, हा राजकारणाचा व सत्ता मिळविण्याचा मार्ग होता. परंतु, एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती संपूर्ण देशाची पंतप्रधान असते, त्यामुळे मोदी यांनी स्थानिक विषयांबाबत फारसे लक्ष घालणे योग्य नव्हे. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानाने कोणत्याच मुख्यमंत्र्यांवर अद्याप तरी टीका केलेली नव्हती. परंतु, मोदी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत, त्यावरून त्यांची राजकीय पातळी खालावली असल्याचे दिसते.