सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मान्यता
पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सल्लागार नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या मान्यतेमुळे सल्लागाराची नेमणूक होऊन या विमानतळाच्या विकासाला गती मिळणार आहे.
मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्री तथा कंपनीचे अध्यक्ष फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी सामान्य प्रशासन विभाग (नागरी हवाई वाहतूक) प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आदी उपस्थित होते. त्या बैठकीत सल्लागार नेमण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.
विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू
पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांमध्ये विमानतळ होणार आहे. विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्टर्सपैकी 2 हजार हेक्टर्सवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम यापूर्वीच डार्स कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरित 832 हेक्टरवर विमानतळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यास मुंबई येथील बैठकीत मान्यता देण्यात आली.