निसर्ग, प्राणीमित्रांकडून चिंता व्यक्त
पुणे (प्रदीप माळी) : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला संरक्षण विभागाची परवानगी मिळाल्यामुळे विमानतळाच्या भूसंपादनासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. विमानतळासाठी जवळपास 3 हजार हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे भविष्यात पुरंदर तालुक्यातील जैवविविधतेवर वाईट परिणाम होईल, अशी चिंता निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.
पुन्हा पशु-पक्ष्यांच्या जागेवर मानवी अतिक्रमण
पुरंदर तालुक्यात नियोजित विमानतळासाठी शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे. त्याचसोबत निसर्ग प्रेमीदेखील पुरंदरमधील जैवविविधता नष्ट होण्याच्या भीतीमुळे नाराज आहेत. येथे अनेक जातीचे प्राणी, पक्षी, जीवजंतू यांचा अधिवास असून विमानतळामुळे ही सर्व जैवविविधता नष्ट होणार आहे. मानवी विकासामुळे नैसर्गिक जैवविविधतेवर विपरित परिणाम झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मानवीवस्तीत बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना, भूकेने होणार्या प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना अनेकदा घडत असतात. जंगली प्राण्याचा अधिवास नष्ट झाल्यामुळे तसेच अन्नसाखळीवर परिणाम झाल्यामुळे जंगलीप्राणी अन्नाच्या शोधात मानवीवस्तीकडे येतात आणि लोकांवर हल्ले करतात.
जंगली प्राण्यांचा मोठा वावर
पुरंदर विमानतळासाठी 2 हजार 800 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतजमीन व वनविभागाची जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या परिसरात जास्त वस्ती नसल्याने जंगली प्राण्यांचा मोठा वावर आहे. प्राण्याच्या अन्नसाखळीसाठी पोषक वातावरण असल्याने समृध्द जैवविविधता येथे पहायला मिळते. त्यामुळे अनेक वाईल्ड लाईफचे अभ्यासक येथे भेट देण्यासाठी येत असतात. या परिसरातील प्राणीजीवन समृध्द असून, परिपूर्ण अन्नसाखळी येथे पहायला मिळते. या भागात लांडगा, कोल्हा, तरस, चिंकारा, ससा, रान मांजर, घोरपड असे प्राणी तर नेपाळी गरूड, पिंगट गरूड, मोरघी, पांगुळ गरूड, देव ससाणा, चिनी ससाणा, लाल डोक्याचा ससाणा, अमूर ससाणा, धाविक तित्तर, ठिपकेदार होला, तपकिरी होला, घनवर, माळ टिटवी, लाल गाठीची टिटवी, भारीट, डोंबारी, वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या, काळे तित्तर, राखी तित्तर, कवड्या वटवट्या, पाण ससाना, शिकरा असे विविध प्रकारचे पक्षी व घोणस, नाग, धामण, मांडूख असे विषारी, बिनविषारी जातीचे असंख्यसाप येथे निवास करतात.
विमानतळामुळे अन्नसाखळी नष्ट होणार
या परिसरात अनेक प्रकारचे प्राणी, पक्षी असून समृध्द अशी जैवविविधता आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी तसेच प्राण्यांच्या अभ्यासासाठी आम्ही येथे वारंवार भेट देत असतो. नियोजित विमानतळामुळे येथील अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होणार आहे.
-विनोद बारटक्के
वाईल्ड लाईफ, फोटोग्राफर