पुणे । पुरंदर विमानतळासाठी लवकरच भूसंपादन अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. मात्र, बाधीत गावांच्या शेतकर्यांचा विमानतळाला तीव्र विरोध आहे. त्यासंदर्भात सोमवारी (दि.5) सर्व बाधित गावांच्या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपतींना इच्छा मरणासाठी निवेदन पाठविणार असल्याचे पारगावचे शेतकरी दिपक मेमाने यांनी दै. जनशक्तिशी बोलताना सांगितले.
पुरंदर येथील नियोजित छ. संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हवाई दलाची परवानगी न मिळाल्यामुळे अडकाठी येत होती. मात्र, ती मिळाल्यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच विमानतळासाठी भूसंपादनाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी देखील शेतकर्यांशी संवाद न साधता त्यांना गृहीत धरले आहे, असा आरोप स्थानिक शेतकर्यांनी केला आहे. विमानतळाला शेतकर्यांचा तीव्र विरोध आहे. संबंधीत पारगाव, खानवडी, एखतपूर, कुंभारवळण, उदाचीवाडी, मुंजवडी, वनपुरी गांवाची एकत्रीत ग्रामसभा सोमवारी (दि.5) घेण्यात येणार असून विमानतळाला विरोधाचा ठराव त्यात मांडण्यात येणार आहे.
विमानतळ सुप्याला न्यावे
विमानतळासाठी शेतकर्यांची जमीन घेऊन त्यांना परतावा देण्यापेक्षा विमानतळ सुप्याला न्यावे. तेथे वनविभागाची मुबलक जमीन असून शासनाला जमीन अधिग्रहण आणि शेतकर्यांना परतावा देण्याचा प्रश्न राहणार नाही. शासनाचीच जमीन असल्यामुळे शेतकर्यांचा देखील विरोध होणार नाही. त्यामुळे विमानतळ सुप्याला न्यावे, असे स्थानिक शेतकर्यांचे म्हणणे आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन
पुरंदर विमानतळाला शेतकर्यांचा विरोध कायम असून कोणत्याही परीस्थितीत शेतकरी विमानतळासाठी जमिनी देणार नाहीत. त्यासंबंधीचे निवेदन आणि बाधीत गावच्या ग्रामपंचायतींचे विमानतळ विरोधाचे ठराव बुधवारी शेतकर्यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले. यावेळी विखे-पाटील यांनी येणार्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थीत करण्याचे आश्वासन शेतकर्यांना दिले, अशी माहिती दिपक मेमाने यांनी दिली.