पुणे । नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी प्रशासकीय तयारी सुरू असताना दुसरीकडे स्थानिक शेतकर्यांचा विरोध मोठ्याप्रमाणात वाढू लागला आहे. येथील स्थानिक शेतकरी बुधवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. रविवारी पुरंदरमधील ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.पुरंदर विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.14) रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळाला विरोध करण्यासाठी पारगाव, खानवडी, वनपुरी, ऊदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मंजवडी या सात बाधित गावातील ग्रामस्थ मोठ्यासंख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून, जिल्हाधिकार्यांना विमानतळविरोधात निवेदन देणार आहेत.
महाग्रामसभा घेऊन विरोध
गेल्या आठवड्यात शेतकर्यांनी महाग्रामसभा घेऊन नियोजित विमानतळ प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला होता. तसेच इच्छामरणासाठी राष्ट्रपतींना पत्रेदेखील पाठविली होती. प्रशासन शेतकर्यांची मुस्कटदाबी करून हा प्रकल्प करत असल्याचे स्थानिक शेतकर्यांचे म्हणणे आहे. विमानतळासाठी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत जमीन द्यायची नसून जमिनीच्या बदल्यात कसलाही मोबदला नको असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
हा दुसरा मोर्चा
पुरंदर विमानतळाला शेतकर्यांचा सुरवातीपासूनच तीव्र विरोध असून गेल्यावर्षी ऑक्टोंबर महिन्यातदेखील स्थानिक शेतकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला होता. तसेच वेळोवेळी बाधित गावाच्या ग्रामपंचायतींनीदेखील विमानतळविरोधात जिल्हा प्रशासनाला ठराव दिले आहेत.