पुरंदर विमानतळ उभारणीला वेग

0

अधिकारी नेमण्याची अधिसूचना : कामाची जबाबदारी निश्‍चित

पुणे : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस आता वेग येणार आहे. शासनाने पुरंदर विमानतळासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच नियोजन करण्यासाठी नगररचना नियोजनकार आदी अधिकारी नेमण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) आता अधिकारी नेमले जाणार असून त्यांच्यावर कामाची जबाबदारीही निश्‍चित केली आहे.

राज्य शासनाने यापूर्वीच एमएडीसी या कंपनीस पुरंदर तालुक्यात विमानतळ उभारण्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. तसेच, पुरंदर तालुक्यातील विमानतळाची हद्द निश्‍चित केली आहे. विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजेवाडी, खानवडी, पारगाव या सात गावांतील 2 हजार 832 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. प्रत्यक्ष विमानतळासाठी सुमारे 2,200 ते 2,300 हेक्टर जागेची आवश्यकता भासणार आहे. उर्वरित जागेवर विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हब या विमानतळ अनुषंगिक बाबी उभारण्यात येणार आहेत. विमानतळाच्या उर्वरित जागेसाठी विकास कामे करण्यासाठी तसेच त्यास परवानगी देण्याची जबाबदारी एमएडीसीकडे आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 152 नुसार एमएडीसीने अधिकार्‍यांना प्राधिकृत केले आहे. यामध्ये नियोजन विभागासाठी नगररचना अधिकारी, अतिरिक्त नगररचना अधिकारी, वरिष्ठ नियोजनकार अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तर भूमि अभिलेख विभागासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांना नेमणार आहेत.