पुरनाड फाट्यावर गुरांची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला ; 45 गोर्‍ह्यांची सुटका

0

पाच गोर्‍हे दगावले ; संतप्त जमावाने फोडल्या वाहनाचा काचा ; चालकासह क्लीनर पसार

मुक्ताईनगर- तालुक्यातील पुरनाड नाक्यावरून मुक्ताईनगरकडे येणार्‍या कंटेनरमध्ये गुरांची अवैधरीत्या वाहतूक होत असल्याचे नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी पाठलाग करून कंटेनर पकडल्याची घटना 3 रोजी दुपारी दोन वाजता पुरनाड फाट्याजवळ घडली. या प्रकारानंतर संतप्त नागरीकांनी कंटेनरवर दगडफेक केल्याने दर्शनी भागाच्या काचा फुटल्या तर या प्रकारानंतर कंटेनर चालकास क्लिनरल पळ काढला. या कंटेनरमधून 45 गोर्‍ह्यांची सुटका करण्यात आली तर पाच गोर्‍हे दगावले.

संशय आल्याने बिंग फुटले
बंदीस्त कंटेनर क्रमांक आर.जे.9 जी.सी. 2861) मध्यप्रदेशकडून मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड चेक पोष्टवर आल्यानंतर चालकाने नियमानुसार टोल पावती फाडली. यानंतर हा कंटेनर पुढे मुक्ताईनगरकडे येत असताना सुरक्षा रक्षकाला संशय आला. यानंतर त्याने लागलीच उपप्रादेशिक अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यांनी पाठलाग करुन टोल प्लाझापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर संशयास्पद कंटेनर अडवला. पथकाला पाहून कंटेनर चालक व क्लिनरने धूम ठोकली. कंटेनरचा मागचा दरवाजा उघडण्यात आला असता दोन कप्प्यांमध्ये दोरखंडाने बांधून गुरांना कोंबल्याचे समोर आले. त्यापैकी 45 गोर्‍हे जिवंत, तर पाच दगावली होती.

गुरांची गो शाळेत रवानगी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कंटेनरवर शिवगणपती लॉजिस्टीक प्रा.लिमिटेड, डाक पार्सलअसा उल्लेख असून तो गो शाळेत आणल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल श्रीखंडे, पवन सोनवणे, अनिकेत भोई, जीवन वानखेडे, वैभव तळेले, किरण निंभोरे, सागर झोपे यांच्यासह अनेक तरुणांनी गुरांना कंटेनरमधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी गुरांवर औषधोपचार केले . या प्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.