मुक्ताईनगर। तालुक्यातील सीमा शुल्क तपासणी नाका चुकवत काही तोतया आरटीओ यांनी त्यांचे खिसे भरण्याचे धंदे मांडले असून अंतुर्ली नायगाव पूरनाडमार्गे होत असलेल्या चोरट्या वाहतुकीला आळा बसावा म्हणून शिवसेनेने वेळोवेळी तोंडी सांगून व लेखी स्वरूपात निवेदने देऊनही चोरटी वाहतूक सुरुच असल्याने 2 रोजी एका युवकाला प्राण गमवावे लागले. त्यामुळे त्वरित दोषींवर कार्यवाही करुन चोरटी वाहतूक बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे दिला आहे.
तोतया आरटीओकडून केली जाते वसुली
मुक्ताईनगर येथील सीमा शुल्क तपासणी नाका चुकविण्याकरीता जास्त वजन असलेल्या वाहनांना पूरनाड- नायगावमार्गे अंतुर्ली असे चोरट्या मार्गाने जाण्याकरीता किमान 7 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रत्येकी अवजड वाहनांकडून वसुली करण्याचे धंदे तोतया आरटीओ यांच्याकडून सुरु आहेत. तसेच शिवसेनेने वेळोवेळी पोलीस प्रशासनाला, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला निवेदने देऊनसुद्धा आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही. परिणामी 2 रोजी पिंप्रीनांदू येथील एका युवकाला प्राण गमवावे लागले. तसेच या आधीसुद्धा एक महिला या चोरट्या वाहतुकीला बळी पडली होती. त्यावेळीसुद्धा शिवसेनेने निवेदने देऊन आंदोलने केली होती. वेळीच चोरट्या वाहतुकीला आळा बसून तोतया आरटीओवर कार्यवाही झाली असती तर त्या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले नसते. तसेच सदरील वाहतूक अशीच सुरू राहिल्यास या पुढेही अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदरील चोरटी अवैध वाहतूक त्वरीत बंद करत दोषींवर कारवाही करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विठ्ठल तळेले, प्रवीण चौधरी, राजेंद्र तळेले, आकाश सापधरे, शुभम तळेले, संतोष कोळी व शिवसैनिक उपस्थित होते.