धुळे- तालुक्यातील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल शिवशक्तीच्या पाठीमागील एका कोरड्या नाल्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत 1 लाख 20 हजार 600 रुपये किमतीचा पेट्रोलसह नाफ्त्याचा साठा जप्त करण्यात आला. एकास ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पुरमेपाडा गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल शिवशक्तीमागे एका कोरड्या नाल्यात पेट्रोल व नाफ्त्याचा साठा साठवून ठेवला असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत एक लाख 20 हजार 600 रुपये किमतीचे 1200 लीटर पेट्रोल, 600 लीटर नाफ्ता भरलेले 9 ड्रम जप्त करण्यात आले. दोनशे लीटर क्षमतेच्या 6 ड्रममध्ये पेट्रोल तर 3 ड्रममध्ये नाफ्ता साठवून ठेवला होता. पथकाने या मुद्देमालासह निंबा खंडू देवरे (रा.पाण्याच्या टाकीजवळ, मोहाडी) यास ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक सुनील भाबड, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हेकॉ सुनील विंचूरकर, नथ्थू भामरे, पोना अशोक पाटील, पोकॉ चेतन कंखरे, चालक गुलाब पाटील यांनी केली.