पुणे । पावसाने उघडीप दिल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्याप पाणी टंचाईची समस्या गंभीर आहे. यामुळे पुरवणी टंचाई आराखड्यातील कामांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास रावदेवकाते यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी चर्चा करून मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
995 कामे कागदावरच
शासनाने पुरवणी टंचाई आराखड्याची कामे 30 जूननंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मुळ टंचाई आराखडा आणि पुरवणी टंचाई आराखडा तयार केला होता. मुळ टंचाई आराखड्यातील कामे 1 हजार 95 कामे प्रशासनाने मुदतीमध्ये पुर्ण केली. मात्र, जिल्हा परिषद सदस्यांनी मागणीनुसार केलेल्या पुरवणी टंचाई आराखड्यातील कामे 30 जूनपुर्वी सुरू झाली नाहीत. कामाची मुदत संपल्यामुळे पुरवणी टंचाई आराखड्यातील जवळपास 995 कामे कागदावरच राहिली आहेत. पाऊस पुरेसा नसल्यामुळे आजही जिल्ह्यातील 24 गावांतील 328 वाड्यावस्त्यांतील 92 हजार 878 नागरिकांना 39 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
200 गावांमध्ये कामे
पुरवणीपाणी टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात 200 गावांमध्ये कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये 723 विंधन विहीरीकुपनिलका घेणे, 48 नळ योजनांची विशेषदुरुस्ती, 85 विंधन विहीरींच्या दुरुस्ती, नळ पाणीपुरवठा योजना वेगाने पुर्ण करणे, 13 तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना, 49 विहिरींचे अधिग्रहण, 37 विहीरींचा गाळ काढून, विहीरी खोल करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, आदी कामे करण्यात येणार होती.