भुसावळ । राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार संदर्भातील मुलाखतीबाबत बोदवड गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक यांना अनभिज्ञ ठेवल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. बोदवड तालुक्यातील चिखली बुद्रूक येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामराव ज्ञानोबा मुरकुटे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी गुगल लिंकद्वारे नोंदणी केली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत त्यांना शासनामार्फत आलेल्या कोणत्याच पत्राबाबत बोदवड गटशिक्षणाधिकारी यांनी कळविले नाही.
मुलाखतींची सूचना मिळेना
दरम्यान, 7 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांनी इतर व्हॉटस् ऍप्स गृपवर राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्याचे पत्र वाचले. महाराष्ट्र शासन शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग नाशिक यांचे 5 मे रोजीचे ते पत्र होते. त्या पत्रात त्यांचे नाव असून मुलाखतीची तारीख 7 मे आणि स्थळ नाशिक असे नमूद होते. मात्र या कालावधीत त्यांना बोदवड गटशिक्षणाधिकारी यांनी कोणत्याच प्रकारची सूचना न देता सदर मुलाखतीपासून वंचित ठेवले. त्यासाठी बोदवड गटशिक्षणाधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी फेरमुलाखती घेण्यात याव्या, अशी मागणी मुरकुटे यांनी केली आहे. तक्रारीच्या प्रती संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत.