पुरात आडकलेल्या इसमाला ग्रामस्थांनी वाचविले

0

विक्रमगड (विजय पटेल) : पालघर जिल्ह्यातल्या तांबाडी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात यश आले आहे. अंकुश पवार असे या 35 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी विक्रमगडचे रहिवासी आटोकाट प्रयत्न करत होते. रविवारी सकाळपासून पालघर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे तांबाडी नदीला पूर आला. पुरात वाहून आलेली लाकडे काढण्यासाठी अंकुश पाण्यात उतरला होता मात्र पाण्याची पातळी वाढल्याने तो पाण्यात अडकला होता. पाण्याचा जोर जास्त असल्याने लाकडासह अंकुशला पाण्याने खेचत नेले. पण दैव बलवान असल्याने लाकडासह अंकुश एका दगडाला अडकला.

3 तासानंतर अंकुश सुखरूप बाहेर
अंकुश आपले प्राण वाचवण्यासाठी हातवारे करु लागला. नदी काठावरील लोकांना तो अडकल्याचे समजताच गावकर्‍यांनी बैल गाडी व नांगराचे दोर गोळा करून दोन धाडसी तरुण जानू डगला व दीपक पवार यांना दोराच्या सहाय्याने पुरात उतरवले. 3 तासाच्या थरारानंतर बचाव कार्याचे समापन झाले व अंकुश पवारला पूरातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

20 गावांचा संपर्क तुटला
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे विक्रमगड तालुक्यातील 20 गावांचा संपर्क तुटला आहे. तर पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड तालुक्यातले नदी-नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. गेल्या 48 तासांपासून देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली आहे. तसंच धरण क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.