चाळीसगाव। ता लुक्यातील ओझर येथील दोघे भाऊ बहीण महादेव मंदिराजवळ पूजेसाठी जात असतांना 8 जून 2017 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास तितूर नदीला अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाऊन डोहात अडकून 9 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह अथक परिश्रमानंतर आज दि 9 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास मयत राहुल बागुल याचा मृतदेह मिळून आला आहे.
बालकाचा पाय घसरल्याने पडला पाण्यात
तालुक्यातील ओझर येथील इंदिरा नगर भागातील रहिवासी जिभाऊ ओंकार बागुल यांची मुलगी सपना राहुल बागुल (वय 11) व मुलगा राहुल जिभाऊ बागुल (वय 9 ) हे दोघे जण 8 जून 2017 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास ओझर गावातील तितूर नदीच्या पलीकडे असलेल्या महादेव मंदिरात पूजेसाठी जात असतांना तितूर नदीला अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने राहुल जिभाऊ बागुल (वय-9) या बालकाचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला व वाहून गेल्याची माहिती त्याची बहीण सपना हिने ओरडून सांगताच गावातील गावकर्यांनी त्या बालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तो नागडोहात बुडाला असल्याचे, समजल्यावरून त्याला तेथून बाहेर काढण्याचा अतोनात प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला बाहेर काढण्यात यश आले नाही.
लोकप्रतिनिधींची भेट
सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यावर आमदार उन्मेष पाटील, तहसीलदार कैलास देवरे, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली. बराच वेळ ते त्या ठिकाणी थांबले होते. रात्री उशिरा पर्यंत त्या बालकाचा शोध सुरु होता. आज सकाळ पर्यंत त्याचा शोध लागला नाही म्हणून धुळे येथील रामदास बाबा यांना पाचारण करून त्यांनी अखेर सकाळी 10.30 वाजता त्या बालकाचा मृतदेह नागडोहातून काढला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.