रेल्वे सुरक्षा बलाच्या सतर्कता : लाखाचा गांजा पकडला
भुसावळ । अप पुरी-अहमदाबाद हावड्यातून गांज्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर भुसावळात गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात बेवारस बॅगेत लाखाचा गांजा आढळल्याने खळबळ उडाली. सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री अप पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसच्या कोच नंबर एस- 5 च्या बर्थ क्रमांक एक ते सहा दरम्यान एक बेवारस बॅग साखळ दंडात बांधून ठेवली असल्याची गुप्त माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक व्ही.के.लांजीवार यांना याबाबत कारवाई करण्यासंदर्भात सूचना मिळाल्यानंतर एएसआय व्ही.पी.त्रिपाठी व एएसआय डी.पी.अहिरवार यांनी रविवारी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी ही एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर आल्यानंतर संबंधित बोगीची तपासणी केली असता त्यातून बेवारस बॅग जप्त करण्यात आली. ऑनड्युटी डीवायएसएस व लोहमार्ग पोलिसांच्या यांच्यासमक्ष बॅगेचा पंचनामा करण्यात आल्यानंतर बॅग उघडण्यात आली असता त्यात गांजा आढळला.
नायब तहसीलदारांसमक्ष पंचनामा
गांजा संदर्भात कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे अधिकार लोहमार्ग पोलिसांना असल्याने हा गांजा लोहमार्ग पोलिसांकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आला. नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या समक्ष गांजाची मोजणी केली असता तब्बल नऊ किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. बाजारभावानुसार त्याची किंमत 94 हजार 940 रुपये असल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तस्करी रोखण्याचे आव्हान
रेल्वेत यापूर्वी सोन्यासह शस्त्राची तस्करी होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. रविवारी गांज्याची तस्करी उघड झाल्याने लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. रेल्वे प्रवासात आधीच चोर्यांचे प्रमाण वाढले असल्याने प्रवासी त्रस्त झाले असतानाच असे प्रकार उघड झाल्यानंतर प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसावळ स्थानकावर रेल्वे गाड्यांची तपासणी झाल्यास अनेक गैरप्रकारांना निश्चित आळा मिळणार आहे मात्र केवळ एखादी माहिती मिळाल्यानंतर कारवाई होत असल्याने तस्करांचे फावले आहे.