पुरी येथे बिबट्याने पाडला गायीचा फडशा

0

ग्रामस्थांमध्ये घबराट ; वनविभागाने केले सतर्कतेचे आवाहन

रावेर- तालुक्यातील पूरी येथे शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच पशू पालकांसह शेतकर्‍यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. पुरी शिवारात तापी नदीच्या काठी गोविंदा कोळी यांच्या शेतात नेहमीप्रमाणे त्यांनी गाय चराईसाठी आणली व एका ठिकाणी तिला बांधून चराईसाठी सोडून दिली. शेतकरी रात्री घरी गाय नेण्याचे विसरल्याने खुंटावर बांधलेल्या गायीवर मध्यरात्री बिबट्याने हल्ला चढवून तिला ठार मारले. याबाबतची माहिती वन विभागाला मिळताच अहिरवाडी वनपाल अतुल तायडे, रवी तायडे, गोविंदा कोळे, वनमजूर विजु पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पगमार्गाचा शोध घेतला असता हा हल्ला बिबट्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, बिबट्याचा असलेला या भागातील वावर पाहता ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.