लंडन । कतारच्या मुताझ इसा बार्शिमने 2.35 मीटर उंच उडी घेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने पाचव्या प्रयत्नात ही कामगिरी केली. स्वतंत्र प्रवेशिकेद्वारे स्पर्धेत उतरलेल्या डॅनिल लिसेन्कोने 2.32 मीटर उडी घेत रौप्यपदक जिंकले. तर माजिड एडिन गझलने 2.29 मीटर उडी घेत कांस्यपदकाची निश्चिती केली. मेक्सिकोच्या एडगर रिव्हेराने 2.29 मीटर इतकीच उडी घेतली.य परंतु गझलने कमी प्रयत्नांत ही कामगिरी केल्यामुळे त्याला कांस्यपदक देण्यात आले.
अखेरच्या दिवशी झालेल्या पुरुषांच्या 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत फ्रान्सच्या योहान दिमिझने सुवर्णपदक जिंकले, तर महिलांच्या 50 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत पोर्तुगालच्या इनेस हेन्रिक्सने विश्वविक्रमाची नोंद करताना सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत वादग्रस्त धावपटू कॅस्टर सेमेन्याने जगज्जेतेपदाला गवसणी घालताना सुवर्णपदकांची हॅटट्रिक साधली. महिलांच्या पाच हजार मी. शर्यतीत केनयाच्या हेलेन ओबिरीने, तर महिलांच्या थाळीफेक प्रकारात क्रोएशियाच्या सॅन्ड्रा पेर्कोविचने सुवर्णपदकाची कमाई केली.