पुणे । पोटदुखीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील तरुणाला प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चक्क गर्भाशय असल्याचा धक्कादायक रिपोर्ट दिला. हा अहवाल पाहून चक्रावलेल्या तरुणाने थेट फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हा अहवाल चुकीचा असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला आहे.
…अन् रिपोर्ट ठरला चुकीचा
सागर गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने सागरने 7 मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली होती. मात्र हा त्रास जास्त असल्याने डॉक्टरांनी त्याला दीनानाथ रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याने सोनोग्राफी केली असता त्याला गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने हातात दिला. या प्रकाराने चक्रावलेल्या सागरने दुसर्या डॉक्टरांचा सल्ला घेणे पसंत केले. दुसर्यांदा केलेल्या तपासणीत मात्र दीनानाथ रुग्णालयाने दिलेला रिपोर्ट चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.
दोन महिन्यांपासून तणावाखाली
या सर्व प्रकारामुळे गायकवाडांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे गायकवाड यांनी तब्बल दोन महिने तणावाखाली घालवले. हा रिपोर्ट चुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सागरचा जीव भांड्यात पडला. याबाबत रुग्णालयाचे संपर्क अधिकारी येडकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी चौकशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले. हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तो तितकाच गंभीर आहे. रुग्णालय कर्मचार्यांच्या छोट्या चुकीमुळे एखाद्याच्या आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर घटना असून अशी चूक एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते.