‘पुरुषोत्तम’चा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

0

पुणे । महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल बुधवारी रात्री उशीरा जाहीर झाला. सहभागी 51 महाविद्यालयांपैकी अंतिम फेरीसाठी 9 महाविद्यालयांची निवड करण्यात आली. प्रेमराज सारडा महाविद्यालयने सादर केलेली एकांकिका ड्रायव्हर, आबासाहेब गरवारे महाविद्यालय संघाची आफ्टर द डायरी, फर्ग्युसन महाविद्यालयची भेट, गरवारे वाणिज्य महाविद्यालयने सादर केलेली मुकुंद कोणी हा पाहिला, न्यू आर्टस् कॉमर्स, सायन्स महाविद्यालय अहमदनगरची माईक, मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाची ए एस प्लिज, श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाची साने आणि कंपनी, बी.एम.सी.सी. महाविद्यालयाने सादर केलेली सॉरी परांजपे, व ‘स.प.’ची भूमिका यांनी बाजी मारली आहे.

9 सप्टेंबरला अंतिम फेरी
8 ऑगस्टला सुरू झालेल्या या स्पर्धेचा नाट्यमय वातावरणात समारोप झाला. प्राथमिक फेरीचे परिक्षण आनंद पानसे, सचिन पंडित आणि रुपाली पानसे यांनी केले. या स्पर्धेची अंतिम फेरी 9 व 10 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. पुरुषोत्तम करंडक आपल्या नावे करण्यासाठी व प्राथमिक फेरीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व संघांनी पुन्हा एकदा जय्यत तयारीला सुरुवात केली आहे.