पुणे । पाच वाजले.. क्षणार्धात भरतनाट्य मंदिराचा आवार तरूणाईने फुलला… पहिली घंटा वाजली आणि सभागृहात अरेरे आव्वाज कोणाचा, हिप हिप हुरेर, अरेरेरे बघाताय काय च्या घोषणा सभागृहात घुमू लागल्या. हे बोलके चित्र आहे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचे. जल्लोषपूर्ण वातावरणात पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला मंगळवारी मोठ्या दिमाखात सुरू झाली.
विद्यार्थी व प्रेक्षकांमधील उत्साह यंदा कायम होता. तरुण-तरुणी विविध प्रकारच्या घोषणा देत आपापल्या संघाचा आत्मविश्वास द्वीगुणीत करत होते. विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयातील प्राध्यापक देखिल मोठ्या उत्सहाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यास मग्न होते. या स्पर्धेचा श्रीगणेशा व्ही. आय. टी या महाविद्यालयाच्या वेध या एकांकिकेने झाला. ही एकांकीका आंतराळातील परकीय जीव सृष्टीचा शोध या विषयावर बेतली होती. त्यानंतर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेल्या साकव या एकांकिकेने उपस्थितांची वाहवा मिळवली. पहिल्या सत्राचा शेवट अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ड्रायव्हर या एकांकिकेने झाला. प्रथम फेरीचे परीक्षण आनंद पानसे, सचिन पंडित आणि रुपाली पानसे करणार असून 51 महाविद्यालयांपैकी उत्कृष्ट सादरीकरण करणार्या नऊ महाविद्यालयांना अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे.