मुंबई । बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत क्षात्र्येक्य समाज व मोरॅक असोसिएशन, मुंबई आयोजित पहिल्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद मोरॅक स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात नमिश स्पोर्ट्स क्लबच्या नितीन पवारने रोमहर्षक अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत आक्रमक व बचावात्मक खेळाचे मिश्रण करत नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय मोरॅक स्पर्धेचा विजेता शिवताराच्या शाहबाज शेखला 35-36, 44-43, 37-32 असे चकित करत स्पर्धेत मोठी खळबळ माजवली तसेच नमिश स्पोर्टस् क्लबच्या विलास आंबावलेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत रिझर्व्ह बँकेच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू हिदायत अन्सारीवर 47-44, 22-40, 46-43 असा निसटता विजय मिळवित स्पर्धेत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. पुरुष दुहेरीतील अंतिम फेरीत राजेश गोहिल विलास दळवी या जोडीने चुरशीच्या अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या लढतीत आक्रमक खेळाचे प्रात्यक्षिक घडवत कल्पेश नलावडे सुदेश वाळके यांच्यावर 18-35, 48-29, 32-17 असा निसटता विजय मिळवित विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
क्षत्रिय युनियन क्लब, वनमाळी हॉल येथे सुरू असलेल्या महिला एकेरी गटाच्या तिसर्या फेरीच्या सामन्यात रिझर्व्ह बँकेची राष्ट्रीय खेळाडू संगीता चांदोरकरने दोन गेम रंगलेल्या लढतीत बी. ए. आर. सी. च्या राणी सिंगचा 34-15, 35-19 असा धुव्वा उडवत आगेकूच केली. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वैभवी शेवाळेने सरळ दोन गेममध्ये नाबार्डच्या अरुंधती जावकरची 40-28, 32-19 अशी झुंज मोडीत काढली. तीन गेम रंगलेल्या रंगतदार लढतीत ए. एम. एस. च्या मानसी शिंदेने आपल्यापेक्षा अनुभवी एम. एन. फाऊंडेशनच्या शैला जाधवचा 35-38, 33-18, 29-27 अशी कडवी झुंज मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवताराच्या सुषमा परदेसीने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या रोझिना गोडॅडला 39-37, 36-34 असे सरळ दोन गेममध्ये नमवले. रिझर्व्ह बँकेच्या शुभदा नागावकरने सरळ दोन गेममध्ये पोस्टल रिक्रिएशन क्लबच्या सुरेखा करवंदेचा 40-30, 42-27 अशा फडशा पाडत आगेकूच केली.
पुरुष एकेरीच्या पाचव्या फेरीच्या सामन्यात एन. एस. फाऊंडेशनच्या पंकज कोंडविलकरने शिवताराच्या देवेंद्र गदाडेला 36-35, 42-32 असे सरळ दोन गेममध्ये नमवले. एन. एस. फाऊंडेशनच्या सचिन घटकांबळेने अटीतटीच्या तीन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत बँक ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संजय नागावकरला 19-32, 34-35, 30-21 असे नमवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शिवताराच्या वाजिद अन्सारीने सरळ दोन गेममध्ये एम. एन. फाऊंडेशनच्या खलिल शेखचा 44-29, 31-10 असा फाडशा पाडत आगेकूच केली. एन. एस. फाऊंडेशनच्या ज्युनिअर राष्ट्रीय खेळाडू ओंकार नेटकेने एम. एन. फाऊंडेशनच्या नीलेश कोरीला 42-32, 37-31 असे नमविले.