शहादा । नंदुरबार जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016 – 17 चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पाँईट मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज मंत्री नरेंदसिंह तोमर, अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योतीबेन पांडुरंग पाटील, व ग्रामसेवक शरद पाटील यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र पुरस्कार स्वीकारला.
महिला सदस्यांची ग्रामपंचायत
पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत ही 100 टक्के महिला सदस्य असलेली ग्रामपंचायत असून गेल्या 15 वर्षापासून बिनविरोध निवड होत असलेली व संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ठ कार्य करणारी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला राज्यातील अनेक मान्यवरांनी व शासकीय अधिकार्यांनी वेळोवेळी भेट देवून मार्गदर्शन केले आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाकडून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या यशाबाद्द्ल आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जि.प. अध्यक्ष रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळे, गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी अभिनंदन केले आहे.