जळगावसह धुळे व नंदुबारात एकाच दिवशी कारवाई
जळगाव: जळगावसह धुळे व नंदुबारात एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लाच घेणार्या पोलिस उपनिरीक्षकासह हवालदार व समन्वयकांना आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
रामानंदच्या हवालदाराला दोन दिवस कोठडी
जळगावच्या रामानंदचा हवालदार संभाजी शामराव पाटील (जेडीसीसी बँक कॉलनी, शिंदे नगर, जळगाव) यास मंगळवारी रात्री दहा हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक करण्यात आली होती. आरोपीस बुधवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 307 प्रकरणात तक्रार स्ट्राँग करण्यासाठी आरोपीने लाच मागितल्याचा आरोप आहे. तपास जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर करीत आहेत.
नंदुरबारातील समन्वयकाला एका दिवसाची कोठडी
अण्णाभाऊ पाटील महामंडळ कौशल्य विकास विभागाचे जिल्हा समन्वयक योगेश निंबा चौधरी (शहादा) याने 3 रोजी तीन हजारांची लाच घेताना मंगळवारी अटक करण्यात आली होती. चौधरी यांना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. तपास नंदुरबार एसीबीचे पोलिस उअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मोहाडीच्या उपनिरीक्षकाला एका दिवसाची कोठडी
धुळ्यातील मोहाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सचिन प्रभाकर गायकवाड यांना 40 हजारांची लाच घेताना नाशिक एसीबीच्या पथकाने मंगळवारी मोहाडी पोलिस ठाण्यातच रंगेहाथ अटक केली होती. गायकवाड यांना बुधवारी धुळे एसीबीने न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मोहाडीतील सहाय्यक निरीक्षकांची बदली
धुळ्यात नव्यानेच रूजू झालेल्या पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी मोहाडीतील लाच प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विलास ठाकरे यांची तडकाफडकी मंगळवारी सायंकाळी बदली करीत त्यांच्या जागी सहाय्यक निरीक्षक संगीता राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गैरप्रकार खपवून घेणार नाहीच, असा इशारा यातून पोलिस दलाला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.