पुणे : वार्यावरची वरात, गणगोत, व्यक्ती आणि वल्ली अशा पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यसंपदेतील निवडक घटकांच्या उत्तम सादरीकरणाने ‘पुलंचा बटवा’ कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. विनोदी ढंगाने व्यक्तींच्या किंवा एखाद्या गोष्टीच्या हलकेच घेतलेल्या कानपिचक्या, व्यक्तींमधील व्यंगातून विनोद करताना देखील त्याला असलेली एक कारुण्याची झालर अशी पु. लं.च्या साहित्याची वैशिष्ट्ये कलाकारांनी खुमासदार शैलीतील विनोदी साहित्यरचना पेश केली.
दत्तजयंतीनिमित्त श्री गुरुदेव दत्त मंडळ, ट्रस्टतर्फे श्री दत्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 22 डिसेंबरपर्यंत कमला नेहरु उद्यानाशेजारील श्री गुरुदेव दत्त मंदिरात होणार आहे. महोत्सवात पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित पुलंचा बटवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अजित सांगळे, पद्माकर कुलकर्णी उपस्थित होते.
सुरुवात वार्यावरची वरात या नाटकातील एका व्यक्तीला आलेल्या अनुभवातील गमती-जमती सांगितल्या. चुकीच्या रस्त्याने जाणारा माणूस आतून किती चांगला असू शकतो हे बबडू या व्यक्तीरेखेतून उलगडण्यात आले. अंतुच्या संपूर्ण प्रवासाला असलेली कारुण्याची किनार रसिकांना भावून गेली. तुला शिकवीन चांगलाच धडा… असं म्हणत ती फुलराणीचे सादरीकरण भावले. कोर्टमधील प्रसंगाने रसिकांमध्ये एकच हशा पिकला. अभय देवरे, वनराज कुमकर, सविता कारंजकर, वैष्णवी कारंजकर यांनी सादरीकरण केले.