सचिन तेंडुलकर : पुलंच्या निवासस्थानाला भेट
पुणे : पुलंचे साहित्य हे अजरामर असून त्यांनी कलेच्या ज्या ज्या क्षेत्रात संचार केला तेथे पुल छाप सोडली. साहित्य, कला, चित्रपट आदी कला क्षेत्रातील पुलंचा वावर आपल्यापिढीतील काही लोकांना अनुभवता आलाही असेल पंरतू अलिकडील पिढीस पुलं जाणून घेण्यासाठी त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुलंच्या बहुगुणांचा आस्वाद घ्यावा. तरुणांनी ही संधी दवडू नये असा सल्ला मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने दिला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शुक्रवार पुलोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुलंच्या निवासस्थानाला भेट दिली. त्यावेळी तो बोलत होता. पुलंच्या जन्मशताब्दी वर्षात यंदाचा पुलोत्सव बहुरंगी होणार असून त्यानिमित्त हा आगळावेगळा योग जुळून आला. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांच्या हस्ते ‘आय लव्ह पुलं’ या कार्यक्रमाच्या लोगोचे आणि पुलोत्सव पुणेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
यावेळी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्षा डॉ. अरुणाताई ढेर, पुलंच्या सुन ज्योती ठाकूर, आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार, विरेंद्र चित्राव, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, तसेच कॉसमॉस बँकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
पुल कुटुंबियांकडून मला मिळालल्या आमंत्रणामुळे मी भारावून गेलो असून मला माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाही आहेत. मला मिळालेले आमंत्रण हा मी माझा सन्मान समजतो. बाबा आणि पुल यांच्यातील मैत्रीचे धागे खूप घनिष्ठ होते. पुलंचे बाबांना येणारे पत्र मी पाहत असे. क्रिकेटमधील माझे आदर्श ब्रॅडमन यांच्या 98 व्या वाढदिवशी माझ्या मनात ज्या भावना उचंबळून आल्या होत्या तशीच काहिशी अवस्था माझी आता झाली असल्याचे तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले.
सचिन म्हणाला, पुलंचे साहित्य हे महान होतेच, परंत त्यांचा सर्वसामान्य मानसांशी असलेले कनेक्ट मला खुप भावला. तुम्ही तुमच्या करीयरच्या वाटेत कितीही प्रगती करत असाल
पंरतू तुम्ही ज्या क्षेत्रात प्रगती करीत आहात त्या कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तुम्ही किती आनंद मिळवून देतात हे खूप महत्त्वाचे आहे. पुलंनी सातत्याने त्यांच्या साहित्य निर्मितीतून सर्वसामान्यांना आनंद दिला. यावेळी आशय सांस्कृतिकचे सतीश जकातदार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचलन केले. तसेच आशय सांस्कृतिकचे विरेंद्र चित्राव यांनी उपस्थितांचे आभार मानले.