पुलवामामध्ये चकमकीनंतर हिंसाचार; 7 जणांचा मृत्यू

0

जम्मू : काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या चकमकीनंतर स्थानिक तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आहे. सुरक्षा दलांनी यानंतर जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला आहे. या हिंसाचारात एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी दिली आहे.

पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले.

सुरक्षा दलांवर स्थानिक तरुणांनी दगडफेक केली. या हिंसाचारात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी दिली. या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून या भागात सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. या हिंसाचारात एकूण १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.