श्रीनगर : दक्षिण काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरात अतिरेकी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर ए तोयबाच्या दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. येथील दोन घरांमध्ये हे अतिरेकी लपून बसले होते. या अतिरेक्यांच्या कुटूंबियांना घटनास्थळी आणून सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्याशी बोलण्यास सांगून आत्मसमर्पण करण्यास सांगितले परंतू शेवटपर्यंत ते शरण आले नाही. बुधवारी रात्री सुरू झालेली ही चकमक गुरूवारी दिवसभर सुरू होती. चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला. मध्यरात्री अडीच वाजता दोन्ही घरांना सुरक्षा यंत्रणांनी घेराव घातला. तर पहाटे चकमकीला सुरवात झाली. लखनऊच्या चकमकीनंतर लगेचच दुसर्यादिवशी ही चकमक सुरू झाल्याने अतिरेकी संघटनांनी आपला मोर्चा भारताकडे वळविल्याचे दिसून येत आहे.
पहाटे चकमकीला सुरवात
या परिसरात अतिरेकी लपल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. अतिरेकी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये पहाटे 4.40 वाजता गोळीबाराला सुरवात झाली. ते जवळपासच्या दोन घरांमध्ये लपून बसले होते. यापैकी एका घराबाहेर एक मृतदेह दिसून येत होता. उशीरापर्यंत तो मृतदेह जखमी झालेल्या अतिरेक्याचा आहे का, याबाबत पोलिसांना माहिती मिळू शकली नव्हती.
आत्मसमर्पणासाठी आईची विनंती
सुरक्षा यंत्रणांनी प्रथम अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. लपून बसलेल्या अतिरेक्यांपैकी एकाच्या आईला घटनास्थळी आणले गेले. आणि सर्व अतिरेक्यांना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली गेली. परंतू या अतिरेक्यांनी आत्मसमर्पण करण्यास नकार दिला.
लोकांकडून दगडफेक
प्रशासनाने चकमक सुरू असलेल्या परिसरातून जाणार्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. कारण अतिरेक्यांकडून या रेल्वेंना लक्ष्य केले जाऊ शकते. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुरक्षा यंत्रणांवरच दगडफेक केली. सुरक्षा पथकांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधूराची नळकांडी फोडली. तसेच संपुर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली. अतिरेक्यांना सहकार्य करण्यासाठीही अशाप्रकारे सुरक्षा पथकांवर दगडफेक करण्याचे प्रकार कश्मिरात घडत आहेत.