पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद

0

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या प्रशिक्षण केंद्रावर रविवारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले असून, तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे. तिसर्‍या दहशतवाद्याचा मृतदेह सोमवारी दुपारी सर्च ऑपरेशनदरम्यान आढळून आला. दहशतवाद्यांसोबतची चकमक थांबली असून, लष्करी जवानांनी या भागातील दोन दिवसांपासून सुरु केलेली शोधमोहीमही थांबविली आहे. तीन दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तळात घुसून हा हल्ला केला होता. या दहशतवाद्यांना लष्करी जवानांनी सडेतोड उत्तर दिले होते. रात्रंदिवस ही चकमक सुरु होती.

पोलिसाचा अल्पवयीन मुलगाच दहशतवादी!
रविवारी अंधार झाल्यानंतर सीआरपीएफ, लष्करी जवान व स्थानिक पोलिसांनी सुरु केलेली शोध मोहीम काही काळासाठी थांबविली होती. भल्यापहाटे ती पुन्हा सुरु करण्यात आली. प्रत्येक घर, परिसर जवानांनी अक्षरशः पिंजून काढला. दुपारच्या सुमारास तिसर्‍या दहशतवाद्याचा मृतदेह जवानांना मिळून आला. धक्कादायक बाब म्हणजे, या दहशतवादी हल्ल्यात सहभागी एक दहशतवादी हा एका पोलिस कर्मचार्‍याचा मुलगा असून, त्याचे वय अवघे 16 वर्ष आहे. काही महिन्यापूर्वीच तो जैश-ए-मोहम्मदच्या कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. सीआरपीएफ तळावर हल्ला करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ संदेशही रेकॉर्ड केला होता. या संदेशाची तपासणी लष्करी अधिकारी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सीआरपीएफ तळावर हल्ला करण्याचे नियोजन तो या व्हिडिओत करत असून, ही व्हिडिओ क्लिप काश्मीर खोर्‍यात व्हॉटसअ‍ॅपवरदेखील व्हायरल झाली असल्याचे दिसून आले आहे. 8 मिनिटांच्या या व्हिडिओत तो अनेक तरुणांना जैश-ए-मोहम्मदमध्ये सामील होण्याचे आवाहन करतानाही दिसून येत आहे.

दहशतवाद्याचा व्हिडिओ संदेश व्हायरल!
लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच आत्मघातकी हल्ल्यापूर्वी अशाप्रकारे व्हिडिओ संदेश रेकॉर्डिंग करून व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लष्करी तंत्रज्ञ या व्हिडिओ संदेशाचे विश्लेषण करत आहेत. स्थानिक युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय लष्कर व केंद्र सरकारच्यावतीने अटोकाट प्रयत्न सुरु असताना अशाप्रकारे दहशतवादी संघटना अल्पवयीन तरुणांना गळाला लावून आत्मघातकी हल्ले घडवित असतील तर हा अत्यंत धोकादायक असा प्रकार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या घटनेचा निषेध केला असून, हे दहशतवादी संघटनेचे भ्याड कृत्य आहे, अशा शब्दांत टीका केली आहे. आम्हाला आमच्या वीर जवानांचा गर्व असून, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, संपूर्ण देश शहीद कुटुंबीयांच्यासोबत आहे, असेही सिंह यांनी सांगितले.