पुलाच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

0

मुंबई । जोगेश्‍वरी पूर्वेतील बांद्रेकरवाडी येथील फ्रांसिसवाडी येथून जाणार्‍या मोठ्या नाल्यावरील 45 वर्ष जूना पूल 2 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे कोसळण्याची घटना घडली होती. हा पूल कोसळल्यामुळे फ्रांसिसवाडीतील स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. या घटनेनंतर मुंबई महापालिका आणि पालिका पुल विभागाने स्थानिकांच्या मागणीनुसार युद्धपातळीवर प्रयत्न करून पाच महिन्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. मात्र पूल पूर्ण झाल्यावर भाजप-शिवसेना या सत्तेत असलेल्या मित्र पक्षात श्रेयवाद रंगला आहे. या दोन्ही पक्षाकडून श्रेयासाठी पुल परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. जोगेश्‍वरीत स्थानिक आमदार रविंद्र वायकर आणि प्रभाग क्रमांक 72 चे नगरसेवक पंकज यादव यांच्यात बॅनर वॉर पहायला मिळत आहे.

नागरिकांच्या हस्ते उद्घाटन
या पुलाचे उद्घटान शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. या पुलाचे श्रेय फक्त फ्रांसिस वाडी आणि बांद्रेकरवाडीतील नागरिकांचे असल्याचे उद्घाटन प्रसंगी नगरसेवक पंकज यादव यांनी सांगितले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष उज्वला मोडक, स्थानिक नगरसेवक पंकज यादव, जोगेश्‍वरी भाजप विधानसभा अध्यक्ष रमण, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. एकीकडे भाजपतर्फे स्थानिक नगरसेवक पंकज यादव यांच्या सातत्याने पाठपुरवा करून फ्रांसिसवाडीचा पुल वेळेत पूर्ण करून घेतल्याचा बॅनर पुल बांधलेल्या परिसरात लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून फ्रांसिसवाडीतील कोसळणार्‍या पुलाची दखल घेत स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी के पूर्व पालिका विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन आणि कार्यकारी अभियंता ठोसर यांच्यासोबत पाठपुरावा करून पूर्ण केला असल्याचा दावा बॅनरद्वारे शिवसेनेने केला आहे.