पुलाच्या जागेचा मोबदला म्हणून पालिका संरक्षण खात्याला देणार 25 कोटी

0

स्थायी समितीची महासभेकडे शिफारस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्या जागेची किंमत म्हणून पालिका संरक्षण विभागाला 25 कोटी रुपये देणार आहे. त्याला स्थायी समितीने मंजूरी देऊन प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात आला आहे. बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याने जाणे सोईचे ठरत होते. मात्र, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने 2015 मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूरकरण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला. मात्र, तो तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी 10 ते 15 किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे.

बोपखेलमधून पुढे खडकीत 512 येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळानदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 44 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणार्‍या या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल रखडला होता.

लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दाखविली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांना 4 एप्रिल 2018 रोजी संरक्षण खात्याचे रक्षा संपदा अधिकारी राजेंद्र पवार यांनी पत्र पाठविले आहे. या पत्रद्वारे संरक्षण खात्याने महापालिकेने मागणी केलेल्या आवश्यक जागेची किंमत संरक्षण खात्याच्या नियमानुससार 25 कोटी 81 लाख 51 हजार 200 रुपये असल्याबाबत कळविले होते. त्यानुसार पालिकेने जागेचा मोबदला म्हणून संरक्षण विभागाला 25 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता देऊन प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात आला आहे.

पुलाबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा
भाजपचे नगरसेवक डोळस म्हणाले की, बोपखेल पुलाचा विषय अत्यंत महत्वाचा आहे़. परंतु, पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने बघत नसून हलगर्जीपणा करत आहे. बोपखेलवासियांना पुलाची अत्यंत गरज असताना त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. बोपखलेच्या आलेल्या पत्रावर तातडीचे असा उल्लेख असताना महिन्यापूर्वी पत्र येऊनही उत्तर दिले गेले नाही. अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. डेअरी फार्मबाबत जेवढी संवेदनशीलता दाखविली तेवढी बोपखेलबद्दल दाखविली गेली नाही.