पुल खचून प्रशासनाचा कामचुकारपणा उघड

0

बीड : 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सावित्री पुलाचे उद्घाटन झाले असताना आता बीड जिल्ह्यातील बिंदुसार नदीवरील पर्यायी पूल खचून पुन्हा एकदा सरकारचे पितळ उघडे पडले आहे. मान्सूनपूर्व पावसाळ्यातच पूल खचण्याच्या घडण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील बार्शी रोडवरील बिंदुसरा नदीपात्रावरील निजामकालीन पुलाची दुरवस्था झाल्याने त्या शेजारी बांधलेला पर्यायी पूलही पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे खचलेल्या पुलावरुन जाणारा एक टेम्पो त्यावरुन कोसळल्याने दोघे जखमी झाले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.

बिंदुसरा नदीपात्रावरील पूल कालबाह्य झाल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने वर्षभरापूर्वीच त्यावरील जड वाहतूक बंद केली होती. औरंगाबादहून येणारी वाहने पाटोदामार्गे तर सोलापूरहून येणारी वाहने मांजरसुंब्याहून वळविण्यात आली होती. दरम्यान, नवीन पुलाचे काम वर्षभरापासून रखडले आहे. प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुर्‍यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु कामास सुरुवात झालेली नाही. या पुलाला चिकटून बांधलेल्या पर्यायी पुलाची उंची कमी आहे. पावसाळा संपल्याने पुराचा धोका टळला होता. त्यामुळे जड वाहनांना हा पर्यायी पूल खुला करण्यात आला होता.

जून उजाडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने पर्यायी पुलावरील जड वाहतूक बंद करणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी, सायंकाळी व मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. बिंदुसरा नदीपात्रातील पुलावरुन पाणी वाहण्यास सुरुवात झाली. पक्के बांधकाम नसल्याने पुलाचा पृष्ठभाग खचला. अर्धा पूल वाहून गेल्यानंतरही वाहतूक सुरुच होती. याचदरम्यान खचलेल्या पुलावरुन सोलापूरहून औरंगाबादकडे जाणारा टेम्पो (क्र. एमएच 26- 6441) कोसळला. यामध्ये चालक व क्लिनर जखमी झाले. त्यांनी कसेबसे टेम्पोबाहेर पडत मदतीसाठी आरडाओरड केली. यावेळी स्थानिक त्यांच्या मदतीला धावून आले. पुलावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी क्रेन बोलावून टेम्पो वर काढण्यात आला.

जड वाहतूक वळविली
पर्यायी पुलावरुन टेम्पो कोसळल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी पर्यायी पुलावरील जड वाहतूक वळविल आहे. औरंगाबादहून येणारी वाहने नगर रोडमार्गे पाटोद्याकडे वळविली असून सोलापूरहून येणारी वाहने नाळवंडी नाका- खंडेश्‍वरी मंदिर-मोंढा रस्तामार्गे वळविली आहेत.

प्रशासनाची बेफिकीरी
पुलावरुन टेम्पो कोसळल्यानंतरही जड वाहतूक वळविली; परंतु अद्यापही त्यावरुन छोट्या वाहनांची वाहतूक सुरुच आहे. पुलाच्या ऐन मधोमध अर्धा भाग वाहून गेलेला आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून दुचाकी, कार, रिक्षा आदी वाहनांची ये – जा सुरुच आहे. त्या ठिकाणी वाहतूक पोलीस देखील नाहीत.