भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानचा उपक्रम ; तीन शाळांमध्ये व्याख्याने
भुसावळ- शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानने संदीप पाटील यांच्या मातोश्री पुष्पा पाटील यांच्या आठवणी जपण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली फिरती प्रबोधनमाला यंदापासून सुरू करण्यात आली आहे. त्यात 23 ऑगस्ट रोजी धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.वा.ना. आंधळे हे प्रथम पुष्प गुंफणार आहेत. विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन, मननाची गोडी लागावी या उद्देशाने ही प्रबोधनमाला सुरू होत आहे.
पहिले व्याख्यान भालोद महाविद्यालयात
प्रथम पुष्प 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता यावल तालुक्यातील भालोद येथील कला, विज्ञान महाविद्यालयात गुंफण्यात येईल. यात धरणगाव महाविद्यालयाचे प्रा.तथा साहित्यिक वा. ना. आंधळे हे ‘काळजातल्या कवितांतून संस्कार पेरणी’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अजय कोल्हे, चोपड्याचे नरेंद्र पाटील, शिवाजी पाटील, धनंजय पाटील यांची उपस्थिती राहील. द्वितीय पुष्प 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या महात्मा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात गुंफले जाईल. धरणगावचे कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे हे ‘विद्यार्थी जीवन समृद्ध करणारा काव्यानंद’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालयाच्या अध्यक्षा वंदना भागवत पाटील या असतील. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील काळे, भालोद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. जतीन मेढे, जळगावच्या बेंडाळे महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा भुसावळचे माजी नगरसेवक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, उडाण फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक निंबाळकर यांची उपस्थिती राहील.पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील, समन्वयक ज्ञानेश्वर घुले, प्रकल्पप्रमुख संजय भटकर यांनी केले आहे.
समारोपाचे पुष्प शनिवारी गुंफणार
प्रबोधनमालेचे तृतीय पुष्प 25 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दीपनगरच्या श्री शारदा माध्यमिक व कनिष्ठ विद्यालयात गुंफले जाईल. चाळीसगावचे कवी मनोहर आंधळे हे ‘दोस्तांनो साहित्याच्या प्रांतात फिरू या’ हा विषय मांडतील. अध्यक्षस्थानी श्री शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आर. एन. गाजरे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे समन्वयक अरुण मांडळकर, नूतन प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक प्रदीप सोनवणे, ग.स.चे संचालक योगेश इंगळे यांची उपस्थिती राहणार आहे.