पुणे । ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाबळेश्वर येथील भिलार या पुस्तकांच्या गावात ‘स्मरण विंदांचे’ हा कार्यक्रम 16 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकाद्वारे दिली.
भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव या महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव प्रकल्पात आता साहित्यिक जाणिवा समृद्ध करणार्या कार्यक्रमांची सुरुवात होत असल्याचे तावडे यांनी सांगितले. मराठी साहित्याचा मानबिंदू असलेल्या विंदांना अभिवादन करण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने पुस्तकांच्या गावी स्मरण विंदांचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे विनोद तावडे म्हणाले.
परिसंवाद, कविसंमेलन व अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरुप असून सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत चार सत्रांत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. डॉ. अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी मान्यवर साहित्यिक, कलाकार व अभ्यासक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच कविवर्य विंदा करंदीकरांच्या परिवारातील जयश्री काळे, आनंद करंदीकर आदी उपस्थित राहणार आहेत. स्मरण विंदांचे या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि पुस्तकांच्या गावाचा अनुभव घेण्यासाठी वाचक-रसिकांनी शनिवारी पुस्तकांच्या गावाला (भिलारला) आवर्जून भेट द्यावी. इच्छुकांनी pustakanchgaav.rmvsgmail.com या ई-पत्त्यावर आपली नावनोंदणी करावी असे आवाहनही तावडे यांनी केले.