मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणारे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. यावरून देशभरात भाजपविरोधात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर हे पुस्तक मागे घेण्यात आले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावरुन आता पुन्हा राजकारण चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर आता राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. पुस्तक झाले आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनीय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.
याशिवाय दुसऱ्या ट्विटमध्ये संभाजीराजे म्हणतात, “आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये”.