पुस्तक प्रकाशनाने सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस लोकसभेत साजरा

0

नवी दिल्ली । संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकसभेतील वातावरण नेहमीच गोंधळाचे असते. पण, बुधवारचा दिवस त्याला अपवाद ठरला. सर्वपक्षीय खासदार एकत्र आले आणि त्यांनी टाळ्या आणि बाकेही वाजवली. त्याला कारणही तसेच खास होते. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा वाढदिवस लोकसभेतील सर्व उपस्थित सदस्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला.

सुमित्रा महाजन यांचा यंदा 74वा वाढदिवस आहे. यानिमित्त सभागृहातील सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले आणि त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे अशा सदिच्छाही दिल्या. सुमित्रा महाजन या मूळच्या कोकणातल्या. दरम्यान, त्यांचा विवाह झाला आणि ही कोकण कन्या इंदूरची सुनबाई झाली. 29 जानेवारी 1965 या दिवशी त्यांचा विवाह इंदूरच्या जयंत महाजन यांच्यासोबत झाला. सुमित्रा महाजन या लग्नानंतर इंदूरमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी इंदूरमधूनच सलग पंचवीस वर्षांहून अधिक काळ लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. दरम्यान, सुमित्राताईंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाजन यांनी लिहिलेल्या नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक 1767 ते 1795 मध्ये मालवा राज्याचा कारभार पाहिलेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारीत आहे. मातोश्री असे पुस्तकाचे नाव असून, हे एक नाटक आहे. हे पुस्तक त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिले होते. या पुस्तक प्रकाशनास पंतप्रधान मोदी यांच्यासोबत, लालकृष्ण अडवाणी आणि इतरही अनेक नेते उपस्थित होते.