पुस्तक प्रदर्शनास शहरातील वाचकांचा मिळाला प्रतिसाद

0

भुसावळ । येथील सार्वजनिक वाचनालयाच्या 147 व्या वर्धापनदिनानिमित्त तीनदिवशीय पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शेकडो वाचकांनी प्रदर्शनीला भेट देवून तसेच वाचनालयात बसून पुस्तकांचे वाचन केले. सार्वजनिक वाचनालयाची स्थापना 20 जुलै 1870 रोजी झाली आहे. हे वाचनालय आपली परंपरा जोपासत दीड शतकाकडे वाटचाल करीत आहे.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यंदा वर्धापन दिनानिमित्त 20 ते 22 जुलै 2017 दरम्यान तीनदिवशीय पुस्तक प्रदर्शनी भरविण्यात आली आहे. 20 रोजी द.शि. विद्यालयातील उपशिक्षक आर.सी. गोसावी यांनी दीपप्रज्वलन तर मुख्याध्यापक राजश्री सपकाळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुस्तक प्रदर्शनीचा शुभारंभ केला. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर, उपशिक्षक दिलीप ढाके, ललितकुमार फिरके, डॉ.जगदीश पाटील, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रदीप चौधरी, प्रदीप पाटील यांच्यासह वाचक उपस्थित होते. ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी वाचनसंस्कृती जोपासून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देण्याची गरज असल्याचे सांगून सार्वजनिक वाचनालयाची माहिती दिली. आभार अवधूत दामोदरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नितीन तोडकर, राजेंद्र मराठे, अवधूत दामोदरे, संतोष चव्हाण यांनी परिश्रम घेतले. तीनदिवशीय पुस्तक प्रदर्शनीचा वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.