पुणे : कोरेगाव भीमा दंगलीमध्ये सुरेश सकट यांच्या घराचे नुकसान झाले. त्या घटनेची पूजा सकट ही साक्षीदार होती. त्यातील आरोपी तिला माहीत होते. त्या बाबत पोलिसात तक्रार देखील देण्यात आली होती. या प्रकरणातून वाचण्यासाठी पूजा सकटची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला. या प्रकरणातील आरोपीना पोलिसांनी अटक करून कडक शिक्षा करावी तसेच कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करून शिक्षा करावी. पूजा सकट हत्या प्रकरणी सत्यशोधन समितीने पुण्यात अहवाल सादर केला.
दोषी आधिकार्यांवर कारवाई करा
शिक्षा होण्याच्या भीतीने पूजा सकट यांची हत्या करून घराजवळील विहिरीत मृतदेह टाकण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणातील आरोपी ऍड सुधीर ढमढेरे यांना हत्येच्या आरोपा खाली अटक करण्यात यावी तसेच सुरेश सकट यांच्या घराचे नुकसान आणि पूजा सकटची हत्या प्रकरणात दिरंगाई करणारे गणेश मोरे आणि गलांडे यांना सहआरोपी करून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सत्यशोधन समितीच्या अहवालातून त्यांनी यावेळी केली.
सुरेश सकट कुटुंबावर दबाव
पूजा सकट हत्या प्रकरणाचे सत्यशोधन समितीचे म.ना.कांबळे म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या वेळी तेथील गावाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरेश सकट यांच्यादेखील घराचे नुकसान करण्यात आले. घराचे नुकसान होताना सुरेश सकट यांची मुलगी पूजा यांनी पाहिले होते. त्या त्याच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. त्या बाबत पोलिसात तक्रारीमध्ये आरोपीची नावेदेखील सांगण्यात आली होती. त्यांना शिक्षा होणार हे निश्चित होते. ज्यांनी घराचे नुकसान केले त्यांच्याकडून सुरेश सकट यांच्यासह कुटूंबावर दबाव आणला जात होता.