पूनमच्या कामगिरीवर महिला संघाचा विजयी चौकार

0

कोलंबो: भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वचषक पात्रता फेरीत विजयी घोडदौड कायम राखली आहे. महिला संघाने झिम्बाब्वे महिला संघावर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात भारताची गोलंदाज पूनम यादव चमकली. तिने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत झिम्बाब्वेचा निम्मा संघ अवघ्या १९ धावा देत माघारी पाठवला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीसमोर झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २८.५ षटकांत अवघ्या ६० धावांवर गारद झाला. पूनमला राजेश्वरी गायकवाडने (२-१८) चांगली साथ दिली. भारतीय महिलांनी हे माफक लक्ष्य अवघ्या ९ षटकांत १ बळीच्या मोबदल्यात सहज पार केले.

सुपरसिक्स गटात बुधवारी भारतीय संघाची लढत बलाढय दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी बांगलादेशचा सामना करायचा आहे. रविवारी भारतीय संघासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. साखळी फेरीत भारतीय संघाने चारपैकी चारही लढतीत विजय मिळवला आहे. हाच विजयी सूर पुढच्या फेरीत कायम राखण्यासाठी भारतीय संघ आतूर आहे. अन्य लढतीत दक्षिण आफ्रिकेने पापुआ न्यू गिनीचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. पाकिस्तानने स्कॉटलंडवर ६ विकेट्सनी मात केली.

‘आजच्या सामन्यात आम्ही काही प्रयोग अंगीकारले. शिखा पांडेला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. आमचे फिरकीपटू चांगली कामगिरी करत आहेत. सुपर सिक्समध्ये आगेकूच करताना आमच्या काही योजना आहेत. कारण त्या फेरीत आम्हाला अव्वल संघांचा सामना करायचा आहे’, असे भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने सांगितले.