कोल्हापूर: भाजपाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत बोगस नावे टाकून लाटत असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ‘हा सगळा पैसा आपल्या बापाचा आहे, त्यामुळे हे पैसे कार्यकर्त्यांना वाटू, असे चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल. मात्र आपण गप्प बसणार नाही. गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा शेट्टींनी दिला.
पूरग्रस्तांसाठी सरकार आणि संपूर्ण राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ येत आहे. मात्र, गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. रेशन दुकानाचा परवाना असलेला आणि संस्थेचा सेक्रेटरी असलेल्या प्रकाश तिपन्नवार याच्या घरावर गावकरी चालून गेले होते. ग्रामस्थ आणि तिपन्नवार कुटुंबिय यांच्यामध्ये यावरुन जोरदार हाणामारी झाली. तिपन्नवार यांच्या सांगण्यावरून तलाठ्याने पूरग्रस्तांची यादी तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.