जळगाव प्रतिनिधी । केरळमधील पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरातून मदतफेरी काढण्यात आली. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे नागरिकांना पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर बाजारपेठांमध्ये मदतफेरी काढण्यात आली. या वेळी अनेकांनी मदत दिली. या मदत फेरीमध्ये दीपक घाणेकर, विनोद कोळी, संदीप कासार, नरेंद्र गाडगीळ, राजेंद्र ज्ञाने, उमेश सोनवणे, सतीश मदाने, पराग महाशब्दे, जिल्हा सह कार्यवाह हितेश पवार, डॉ. रितेश पाटील आदींसह स्वयंसेवक सहभागी झाले होते. दरम्यान, पुढील सात दिवस हे निधी संकलन चालणार आहे. यासाठी धनादेश रा.स्व.संघ जनकल्याण समिती, जळगाव या नावाने स्वीकारला जाणार आहे. तसेच समितीच्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या नवीपेठ शाखेच्या खात्याद्वारे ही मदत स्वीकारली जाणार आहे. अधिक माहितीसाठी रा.स्व.संघ जनकल्याण समिती ६५ बळीरामपेठ व डॉ. रितेश पाटील, विनोद कोळी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी २१ हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला.