जळगाव – पूरग्रस्त केरळ राज्यासाठी गणेश मंडळाने सामाजिक भावनेतून मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज नियोजन भवनात केले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पूर्व तयारी वआढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर पोलिस अधीक्षक रोहित मताने, चाळीसगाव पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माऊलीकर उपस्थित होते. येणार्या गणेश उत्सवात करायचे उपाय योजना व पूर्वतयारी याबाबत आढावा घेण्यासाठी आज जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त आढावा व पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री निंबाळकर म्हणाले, सार्वजनिक सण साजरा करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा. केरळ पूरग्रस्त भागासाठी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस सर्व गणेशोत्सव मंडळ, महामंडळांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेश सणासाठी आवश्यक असणार्या सर्व परवानग्या एकाच खिडकीतून दिल्या जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके तर तालुकास्तरावर तेथील तहसीलदार संपर्कप्रमुख राहतील. या बैठकीत गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी तसेच प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या सूचना व अडचणी यावेळी सादर केल्या. आरास पाहण्यासाठी तयार केलेला मार्ग महिला व पुरुषांसाठी वेगळा असावा, 24 तास एक टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल, पट्टीचे पोहणारे विसर्जनाच्या दिवशी विषय ठिकाणी तैनात केले जातील, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाची यासाठी मदत घेण्यात येईल. रक्तदानाविषयी जागृती करण्यासाठी तसेच समाजप्रबोधनासाठी आवश्यक असणार्या देखावे यावेळी तयार करण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्रीच्या आगमनापूर्वी मिरवणूक रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती करण्यात येतील, निर्माल्य गोळा करण्यासाठी प्रत्येक गावात नगरपरिषदांमध्ये रिक्षाद्वारे व्यवस्था करावी. त्याद्वारे स्वच्छ भारत निर्मितीकडे आपण वाटचाल करू. एक गाव एक गणपती संकल्पना चांगली असून हा निर्णय त्या गावाने घ्यायचा आहे. याचबरोबर ज्यांचे वय 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होणार आहेत अशांनी आपली नावे मतदार म्हणून मतदार यादीत नोंदवून मतदानाचा हक्क बजावा याबाबत जनजागृती करण्याचा देखावा सार्वजनिक गणेश मंडळाने उभा करावा. जिल्ह्यात 14 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाची मोहीम सुरू होत असून जिल्ह्यातील एकही बालक यापासून वंचित राहणार नाही याचा प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी महामंडळाने सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात महिलांची सुरक्षा तसेच फिरते स्वच्छतागृहे यासाठी विशेष दक्षता घेतली जाईल.
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी यावेळी विघ्नहर्ता पुरस्कार योजना, डॉल्बी मुक्तीकडून जलयुक्तीकडे, महिला सुरक्षा, गावागावात सीसीटीव्ही मुक्तीकडून सुरक्षेकडे, विघ्नहर्ता पुरस्काराचे स्वरूप, तालुका स्तरावरील प्रथम महामंडळास रुपये दोन हजार रुपये, द्वितीय मंडळास रुपये एक हजार रुपये, तृतीय मंडळास सातशे रुपये तसेच जिल्हास्तरीय मंडळात पहिला येणार्या मंडळास रुपये पाच हजार रुपये, दुसर्या येण्यार्या मंडळास तीन हजार रुपये, तिसरा येणार्या मंडळास दोन हजार रुपये सोबत एक प्रशस्तीपत्र दिले जाईल, असे सांगून मंडळांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अपर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी प्रास्ताविक केले. चाळीसगावचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले.