जळगाव: पूरग्रस्त केरळ राज्यासाठी गणेश मंडळाने सामाजिक भावनेतून मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी नियोजन भवनात केले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पूर्व तयारी व आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर पोलिस अधीक्षक रोहित मताने, चाळीसगाव पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माऊली कर उपस्थित होते.
येणाऱ्या गणेश उत्सवात करायचे उपाय योजना व पूर्वतयारी याबाबत आढावा घेण्यासाठी आज जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी, पोलीस अधिकारी यांची संयुक्त आढावा व पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री निंबाळकर म्हणाले, सार्वजनिक सण साजरा करताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा. केरळ पूरग्रस्त भागासाठी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस सर्व गणेशोत्सव मंडळ, महामंडळांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेश सणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच खिडकीतून दिल्या जातील. जिल्ह्याच्या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके तर तालुकास्तरावर तेथील तहसीलदार संपर्कप्रमुख राहतील.