कोल्हापूर : पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे दोन्ही आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने आले. शाहुपुरीतील चौकात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. काही मिनिटं दोघांनी संवाद साधला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांना निरोप पाठवला होता, अशी माहिती समोर आली आहे
राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध भागांचे दौरे करत आहेत. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुराचा फटका बसलेल्या शिरोळ येथील नृसिंहवाडी गावाला भेट दिली. दरम्यान शिरोळमध्ये निवारा केंद्रात राहत असलेल्या गावकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्त भागातील तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातल्या चिखली गावात देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली व तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान, कोल्हापुरातील शाहुवाडी चौकात हे आजीमाजी मुख्यमंत्री समोरासमोर आले होते.
यावेळी, तातडीची मदत दिलीच पाहिजे पण एक कायमस्वरुपी मार्ग काढला पाहिजे अशी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप दिल्यामुळे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहुपुरीतच थांबले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. मी शाहुपुरीत येत आहे. त्यामुळे तुम्ही शहापुरीतच थांबा. पूरग्रस्त भागाची वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्रच पाहणी करू, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून फडणवीसांना पाठवला होता. त्यामुळे शहापुरीतून निघण्याच्या तयारीत असलेल्या फडणवीसांनी थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर शाहुपुरीतील एका चौकात दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यांनी काही वेळ एकमेकांसोबत चर्चा केली. या भेटीबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांता निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरं होईल. मुख्यमंत्र्याचा अशाप्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली.