पूरपरिस्थितीचे पडसाद अद्याप कायम

0

मुंबई । पश्‍चिम उपनगरात दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य पसरले. डोंगराळ भागातील माती आणि चिखल घरात व दुकानांमध्ये शिरला. तो घराबाहेर काढतांना नागरिकांनी अक्षरशः तारेवरची कसरत केली. मात्र, ज्यांनी हा कचरा दुकानाबाहेर आणि परिसरात काढून ठेवला आहे, तो उचलण्यासाठी आता याच नागरिकांकडून पालिका प्रशासनाच्या मागे अक्षरशः तगादा लावला आहे. त्याकरता पालिका कर्मचार्‍यांवर लोकप्रतिनिधींकडून दबाव येऊ लागला आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी आणि अधिकारी संतप्त झाले आहेत. पालिका कर्मचार्‍यांना घरी जाऊ न देता त्यांना आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी अधिकार्‍यांनी थांबवून ठेवल्याने या कामगारांनी नाराजी व्यक्त केली.

अतिवृष्टीमुळे मुंबईत सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य निर्माण झाले घरातील गाळ उपसून मुंबईकरांची दमछाक झाली असतांना आता घराबाहेर काढलेला कचरा उचलतांना महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुळामध्ये मुंबई तुंबण्यामागे मुंबईकरांचीच बेशिस्ती कारणीभूत आहे.

मुंबईकर राजरोसपणे प्लास्टिकचा वापर करतात, प्लास्टिकच्या पिशव्या कचर्‍यात फेकून देतात. त्यामुळे नाले तुंबतात, त्यातून गाळ काढतांना महापालिकेच्या कचरा कामगारांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. त्यामुळे आता पालिकेच्या सफाई कामगारांनी मुंबईकरांनी शिस्तीचे पालन करावे, अशी मागणी करू लागले आहेत. जे कोणी प्लास्टिकचा कचरा करतील, त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी हे कामगार करू लागले आहेत. त्यासाठी कडक उपाययोजना करा, असेही कामगार म्हणत आहे. जर उच्चभ्रू वस्तीपासून ते झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍यांनी सर्वांणी जर ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो जमा केला, तर मुंबईतील बहुतांश प्रश्‍न सुटतील, पुन्हा मुंबापुरीची तुंबापुरी होणार नाही, असेही कामगार म्हणतात.

पालिकेकडे कामगारांची वानवा
पालिकेच्या काही अधिकार्‍यांना रस्त्याची डागडुजी करण्यासाठी जुंपल्याने ते अधिकारी खड्डे भरण्याच्या कामात व्यग्र होते. ठिकठिकाणचे खड्डे डांबर टाकून भरण्यात येत होते. मात्र, माल (मटेरियल) कमी पडल्याने अधिकार्‍यांनी ठेकेदारांना धारेवर धरले होते. पोयसर आणि कांदिवली पूर्व या ठिकाणच्या नाल्याशेजारील संरक्षक भिंती पावसाच्या जोरदार पाण्यामुळे पडल्याने लोकप्रतिनिधींनी त्यांची पाहणी केली; पण तो ढिगारा उपसण्यासाठी पालिकेकडे कर्मचारीच नसल्याने काम कोणाला सांगावे आणि आदेश कोणाला द्यावेत, या द्विधा मनःस्थितीत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी होते.

जोगश्‍वरी पश्‍चिम भागातील विकासकामामुळे आणि या परिसरात तबेले असल्याने तिथे पुराच्या पाण्यामुळे प्रचंड कचरा जमा झाला असून त्या विभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी असल्याने लोकप्रतिनिधींनी पालिका अधिकार्‍यांना धारेवर धरले. मात्र, अधिकार्‍यांनी, ’आम्ही कोणती कामे करायची?’ असा सूर लावताच, ’जनतेच्या मागणीमुळे आम्ही तुम्हाला हे काम सांगत आहोत. हे काम काही आमच्या घरचे नाही,’ असे म्हणून नगरसेवकांनी वेळ मारून नेली. गोरेगाव संतोष नगर आणि मालाड बचानी नगर व तानाजी नगर येथेदेखील हीच परिस्थिती होती. लोकांनी आपल्या दुकानातील आणि घरातील कचरा रस्त्यावर आणून फेकला होता. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. या कचर्‍यामुळे काही ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंगदेखील घडल्याचे सांगण्यात येते.

साधनसामग्रीचा तुटवडा
पालिका अधिकारी जेसीबीने कचरा उचलण्यासाठी प्रयत्न करत होते; पण त्यांना जेसीबी वेळेवर मिळत नव्हते. जेसीबींना जादा भाडे देऊनदेखील सफाईच्या कामासाठी लोक यायला तयार नव्हते. ’आर’ दक्षिण, ’आर’ मध्य विभागातील पालिका अधिकारी सफाईच्या कामावर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांना कर्मचार्‍यांचा अपुरा पुरवठा असल्याने अधिक त्रास सहन करावा लागत होता.