पूरपरिस्थितीमुळे शांतीनगरवासियांचा जीव टांगणीला

0

येरवडा (सोमनाथ साळुंके) । महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करूनही शांतीनगर भागातील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा सामना करण्याची वेळ दरवर्षी येत असते. असा पूरसदृश्य परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. विश्रांतवाडी भागात शांतीनगर व इंदिरानगर ह्या दोन झोपडपट्ट्या मुठा नदीकाठी वसलेल्या आहेत. येथे राज्यासह परराज्यातील नागरिक कामामुळे या भागात अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत. विश्रांतवाडीसह धानोरी, कळस आदी भागातील सांडपाणी व पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी पालिकेच्या वतीने ह्याच भागातून ड्रेनेज लाइन टाकण्यात आली आहे.

मालमत्तेचे नुकसान
ऐन पावसाळ्यात येथील नागरिकांना पूरस्थितीचा सामना करण्याशिवाय पर्याय राहत नाही. कारण पवना धरणातूनच परिसरात पाण्याचा विसर्ग होत असतो जर धरणक्षेत्रात जास्त प्रमाणात पाणीसाठा झाला तर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे शांतीनगर, इंदिरानगर भागातील झोपडपट्टी पूर्णपणे जलमय होत असते. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो. त्यांच्या घरांत पाणी शिरत असल्यामुळे त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जीवितहानी होऊ नये म्हणून नागरिकांना दरवर्षी सुरक्षित हलवले जाते, मात्र त्यांच्या मालमत्तेचे होणारे नुकसान कोण भरून काढणार हा प्रश्‍न त्यांच्या समोर आ वासून उभा असतो.

ड्रेनेजचे पाणी घरात
विश्रांतवाडी, धानोरी, कळस परिसरातून सांडपाणी व पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जरी ड्रेनेज लाइन टाकण्यात आली असली तरी पण पाण्याच्या जास्तीच्या प्रवाहामुळे ड्रेनेज लाइनमधील पाणीही झोपड्यांमध्ये शिरत असल्याने होणार्‍या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. नागरिकांची मुख्य समस्या लक्षात घेऊन पालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून झोपडपट्टीलगत संरक्षक भिंत बांधण्यात आली असली तरीही पूरपरिस्थिती निर्माण होत असेल तर या भिंतीचा उपयोग काय? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. निवडणूक काळात विविध पक्षातील राजकीय नेते ही समस्या सोडविण्याचे जरी आश्वासन देत असले तरी ती आश्‍वासने हवेतच विरली जात असल्याचे येथील परिस्थितीमुळे जाणवते. त्यामुळे या भागातील नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लागणार का? याचे उत्तर सध्यातरी अनुत्तरीतच आहे.

उपाययोजना करण्याची गरज
या भागातील नागरिकांची पूरपरिस्थितीमुळे काय त्रेधा उडते? ती येथील नागरिकांनाच माहीत आहे. पालिकेच्या वतीने जरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत असली तरी पण नागरिकांवर अशा परिस्थितीत येणारे संकट कशाप्रकारे टाळता येईल, यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
– राहुल छजलाणी, मनसे, शाखा प्रमुख