मुक्ताईनगर- मुक्ताईनगर-बर्हाणपूर रस्त्यावरील पूर्णाड फाट्याजवळ एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या विदेशी दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून मुक्ताईनगरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 46 हजार 740 रुपयांची विदेशी दारूसह एक लाख रुपये किंमतीचे वाहन जप्त केले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
1 एप्रिल रोजी फाट्यावरून एका चारचाकी वाहनात विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक अशोक उजगरे यांच्यासह पोलीस नाईक मोजेस पवार, कल्पेश आमोदकर, कांतीलाल केदारे व मारुती भांगे यांनी कारवाई करत चारचाकी (क्रमांक एम.एच.18 ,14 33) या गाडीची तपासणी केली असता त्यात विविध कंपन्यांचे 46 हजार 740 रुपयांचे विदेशी मद्य जप्त आढळले. पोलिसांनी मद्यासह वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी चालक सचिन राजाराम चांदसरे व विदेशी दारूचे मालक ओमप्रकाश चापरे (दोन्ही रा.भुसावळ) यांना अटक करण्यात आली.