नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. त्यामुळे देशभरात चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. पंतप्रधान मोदींच्या निर्णयाआधी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांचा पुरेसा साठा तयार होता, असे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदेच्या स्थायी समितीला सांगितले.
नोटाबंदीच्या या निर्णयावर गोपनीयता ठेवायची होती, त्यामुळे याबद्दलच्या चर्चेची कोणतीही नोंद ठेवण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितले. बनावट नोटा आणि काळ्या पैशाला आळा बसावा यासाठी चलन बदलण्यात आले. या प्रक्रियेसाठी रिझर्व्ह बँकेने सर्वतोपरी प्रयत्न केले. चलन छपाईसाठी आवश्यक असणार्या संसाधनांवर वेळोवेळी चर्चा करण्यात आली होती. नोटाबंदीचा निर्णय जाहीर होण्याच्या काही महिन्यांपूर्वीपासूनच 500 आणि 2000 हजारांच्या नव्या नोटांच्या छपाईचे काम सुरू करण्यात आले होते, अशी माहिती पटेल यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा काळा पैसा नष्ट करण्यासाठी, अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी आणि दहशतवाद्यांना मिळणारे अर्थसहाय्य थांबवण्यासाठी होता, असे उर्जित पटेल यांनी स्थायी समितीला सांगितले. यामुळे नागरिकांना काही त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती.