पूर्व वैमनस्यातील वाद बेतला जीवावर

0

भुसावळ । मिळेल ते काम करून उपजिवीका भागवणार्‍या व कुटुंबाचा आधारवड असलेल्या ललित उर्फ विक्की हरी मराठे (24) या तरुणाच्या अचानक झालेल्या वादातून खून झाल्याने शहरातील न्यु एरिया भागात बुधवारी कमालीची शांतता पसरली होती. मराठे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेला ललित सहसा कुणाच्या देण्या-घेण्यातही नसल्याची माहिती या भागात भेट दिल्यानंतर मिळाली. वेळप्रसंगी केटर्सचे काम करीत असलेला ललित प्रभागातील न्यू इंडिया सब्जी मंडी मंडळाचा कार्यकर्ता असल्याने बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत मंगळवारी सहभागी झाला मात्र त्याच्यासाठी हा उत्सव अखेरचा ठरला. या घटनेने या भागात शोककळा पसरली असून अनेक घरात चुली पेटल्या नाहीत. अत्यंत शोकाकुल वातावरणात बुधवारी दुपारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

न्यु एरियात पेटल्या नाहीत चुली
केटरींग तसेच मिळेल ते मोलमजुरीचे काम करणारा ललित हा आपल्या साध्या स्वभावाने संपूर्ण प्रभागाला परीचित होता. त्याचे वडील हरी मराठे हे रीक्षा चालवून उदरनिर्वाह करतात तर आई गृहिणी असून एक विवाहित बहिणही आहे. अतिशय साधारण परिस्थितीत जीवत व्यतित करणार्‍या कुटुंबातील एकुलता एक मुलाच्या निधनाने बुधवारी या भागातील अनेक घरांमध्ये चुली पेटल्या नाहीत. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात तापी नदीवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मध्यरात्रीच आरोपीच्या आवळल्या मुसक्या
मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडली असलीतरी याबाबत पोलिसांसह अनेकांना याची माहिती नव्हती. अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना माहिती कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी तसेच गोदावरी रुग्णालयात धाव घेत माहिती जाणून घेतली. आरोपीला पकडण्यासाठी तातडीने पोलिसांना सूचना करण्यात आल्या. शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (20) लपून बसला असल्याची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली. बुधवारी आरोपीस न्यायालयात हजर केले असता 11 सप्टेंबरपर्यंत सहा दिवसाचीं पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चाकूही जप्त करण्यात आला.

गणेशोत्सवाला प्रथमच गालबोट
पोलीस दप्तरी भुसावळ संवेदनशील असलेतरी गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात गणेशोत्सवात कुणाचाही खून झाल्याचे ऐकिवात नसल्याचे जाणकार सांगतात मात्र सुमारे 30 वर्षांपूर्वी नेहरू मैदानावर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते शिवाय गणेशोत्सवात किरकोळ हाणामार्‍याही नवीन नाहीत मात्र आपसी वादातून थेट चाकू मारून एखाद्या कार्यकर्त्याचा खून झाल्याची दुर्दैवी घटना भुसावळात प्रथमच घडल्याने शहराचा नावाला पुन्हा एकदा बट्टा लागला.

इतिहास घडला मात्र दुर्दैवी घटना घेवून
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अवैध धंद्यांवर कारवाई करीत पोलीस विभागाचा दरारा निर्माण करून शहरवासीयांची मने जिंकली होती. विशेष म्हणजे भुसावळच्या इतिहासात 10.40 वाजता सर्व मंडळांच्या मिरवणुका आटोपण्याची यशस्वी कामगिरीही त्यांच्या काळातच मंगळवारी घडली मात्र बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोरूनच जाणार्‍या विसर्जन मिरवणुकीत दोन कार्यकर्त्यांमध्ये वाद होवून खून झाल्याने शहराचे नाव पुन्हा एकदा खराब झाले आहे. अचानक ही घटना घडली असलीतरी भविष्यात मात्र पोलिसांना सजग रहावे लागणार आहे हे नक्की !

कुरापत बेतली जीवावर
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार न्यू इंडिया सब्जी मंडळ हे मुख्य मिरवणुकीत सहभागी न होता न्यू एरियातून श्री विसर्जनासाठी निघाले होते. शिवाजी कॉम्प्लेक्सजवळ हे मंडळ येताच संशयीत आरोपी राजेंद्र उर्फ गोलू सुभाष सावकारे (20) याने मयत ललितला आपल्या बहिणीची छेडखानी का करतो? म्हणून जाब विचारत वाद घातला. दोघांमध्ये हाणामारी झाली. आरोपी सावकारेने आपल्याकडे असलेला धारदार चाकू ललितच्या डाव्या बरगडीत मारून पळ काढला. सुरुवातीला किरकोळ इजा झाल्याचे कार्यकर्त्यांना वाटल्याने त्यांनी शहरातील डॉ.राजेश मानवतकर यांच्या रुग्णालयात हलवले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने गोदावरीत हलवण्याचा सल्ला देण्यात आला मात्र रस्त्यावर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वीदेखील उभयंतांमध्ये हाणामारी झाली होती मात्र प्रकरण पोलिसांपर्यंत न जाता परस्पर मिटवण्यात आल्याची माहिती आहे. सदरील खुनामुळे भुसावळ शहरासह तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.