पृथा वर्टीकर, हवीश असराणीला अजिंक्यपद

0

पुणे। पुण्याची पृथा वर्टीकर आणि मुंबई उपनगरचा हवीश असराणी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करून अनुक्रमे कॅडेट (12 वर्षांखालील) मुली व मुलांच्या गटात विजेतेपद संपादन करत डेक्कन जिमखाना आयोजित मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा गाजवली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील कॅडेट (12 वर्षांखालील) मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या सामन्यात पुण्याच्या अव्वल मानांकित पृथा वर्टीकरने ठाण्याच्या दुसर्‍या मानांकित आर्या सोंगडकरचा 11-7, 8-11, 11-6, 11-9 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून विजेतेपद मिळवले. पृथाचे या गटांतील हे दुसरे विजेतेपद आहे. पृथाने त्याआधी उपान्त्य लढतीत नाशिकच्या पाचव्या मानांकित तनिषा कोटेचा हिच्यावर 12-10, 11-4, 11-3 अशी मात करून अंतिम फेरी गाठली होती. तर दुसर्‍या उपान्त्य सामन्यात आर्या सोंगडकरने ठाण्याच्याच 11व्या मानांकित साची दळवीचा प्रतिकार 13-11, 14-12, 12-10 असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक मारली होती. कॅडेट (12 वर्षांखालील) मुलांच्या गटातील अंतिम लढतीत मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकित हवीश असराणीने आपला शहर सहकारी तिसर्‍या मानांकित कुशल पटेलला 11-9, 11-6, 11-5 असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले. हवीशचे हे तिसरे विजेतेपद आहे.

हवीशने त्याआधी उपान्त्य लढतीत मुंबई उपनगरच्या तृतीय मानांकित कुशल पटेलचा 11-9, 11-6, 11-5 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवीत कॅडेट मुलांची अंतिम फेरी गाठली होती. तर तिसर्‍या मानांकित कुशल पटेलने नाशिकच्या बिगरमानांकित कुशल चोपडाचा कडवा प्रतिकार 10-12, 11-4, 5-11, 11-7, 11-8 असा संपुष्टात आणताना अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.