पृथ्वीचा निरोप की, नवनिर्मिती?

0

जगाकडे पाहण्याची प्रत्येकाची स्वत:ची स्वतंत्र अशी एक दृष्टी असल्याने ज्या दृष्टीने तुम्ही जगाकडे पाहाल तसे जग नजरेस पडते. सर्वसामान्य माणूस आपले जीवन जगताना एवढा मेटाकुटीला आलेला असतो की, त्याची दैनंदिनीची जगरहाटी हेच त्याचे जग असते. त्यामुळे जगाची चिंता त्याला सतावत नसते. पण शास्त्रज्ञ, धर्मपंडित, तत्त्वज्ञानी विचारवंत यांना मात्र तसे करून चालत नाही. मानवजातीला सावध करण्यासाठी त्यांच्याकडून जगाचा शोध आपापल्यापरीने घेतला जात असतो.

असाच एक वेगळा शोध जगप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी याच महिन्यात मांडला आणि त्यांनी जगातील माणसांची झोपच उडवून टाकली. त्यांच्या शोधाचा सारांश म्हणजे, विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होत चालला असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरून राहण्याची इतर प्राण्यांची कला मनुष्याने गमावली आहे. मानवाने केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरू शकते. हवामान बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे पृथ्वी भकास होईल. त्याकारणे मानवाला राहण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल. येत्या शंभर वर्षांत माणसाला पृथ्वी सोडावी लागेल.

स्टीफन हॉकिंग यांच्या संशोधीभाष्यामुळे, मानवजातीने खरेच पृथ्वीचा निरोप घ्यायचा की सावध होऊन सृजनाची मानवी परंपरा अखंडितपणे चालू ठेवत पृथ्वीचा योग्य सन्मान करत मानवाला राहायला सुयोग्य असेल, अशी नवनिर्मिती करत पृथ्वीची काळजी वाहायची याचा विचार मानवजातीला करावा लागेल. यासंदर्भात भारतीय शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे आशावादी विचार नक्कीच सर्वांना मार्गदर्शक ठरू शकतात.

आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा शोध मानवाच्या पाया खालची वाळू सरकवणार आहे. पण हा शोध म्हणजे अंतिम ब्रह्म वाक्य समजण्याची काही गरज नाही. संशोधनाचे निष्कर्ष मानवी समूहाला सावध ऐका पुढच्या हाका, असे सांगत असतो. म्हणूनच हॉकिंगच्या भाकितावर विचार करताना भारतीय शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी 2011 साली, मानवाने सामूहिक जबाबदारी समजून वागले तर हे जग सुखाचे ठिकाण ठरू शकते, असे विचार मांडले होते. हार्वर्ड विद्यापीठात 2011 साली डॉ. अब्दुल कलाम यांनी 2030 साली जग कसे असेल यावर भाष्य केले. त्यांच्या त्या भाषणाचा गोषवारा स्टीफन हॉकिंग यांच्या पृथ्वी नष्टतेच्या निष्कर्षाला नक्कीच छंद देऊ शकतो. म्हणूनच डॉ. अब्दुल कलाम यांचे ते प्रसिद्ध भाषण समजून घेणे अगत्याचे ठरते. 2030 साली आपले जग कसे असायला हवे, या विषयावर आपले विचार मांडताना डॉ. अब्दुल कलाम म्हणतात, आज जगासमोर गरिबी, निरक्षरता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, स्वच्छ आणि पर्यावरण संवर्धन साधणारी वीजनिर्मिती, साधनसामग्रीचे न्यायवाटप, उच्च जीवनमूल्यांचे संस्कार करणारे दर्जेदार शिक्षण पुरवणे, रोगांचे निवारण, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि चांगले राहणीमान जनतेसाठी उपलब्ध करणे ही आव्हाने आहेत. या समस्यांच्या कारणांमागे आणि त्यावरील उपायांमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक आहेत म्हणूनच उपाययोजना शोधून काढणे ही जगभरातील सर्वच देशांची जागतिक समाजाची सामूहिक जबाबदारी ठरते. आताच्या जगात नवे शोध आणि त्यांचा उपयोग यांना भौगोलिक किंवा राजकीय बंधनांमध्ये जखडून ठेवता येत नाही.

ते जग असे असेल, ज्यात प्रत्येक राष्ट्र आपल्या नागरिकांना स्वच्छ, हिरवेगार पर्यावरण देऊ शकेल, प्रत्येक राष्ट्र उत्कर्षशील, सुरक्षित दहशतवादापासून मुक्त, शांत आणि सुखी असेल व त्यामुळे ते राष्ट्रांमधील, समाजांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभारून, कार्यान्वित करून शांतता आणि उत्कर्ष हेच आपले ध्येय मानतील. सन 2030मधील जगाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असेल, ग्रामीण आणि शहरी जीवनातील विषमता कमी करणे. जगभरातील तीनशे कोटींहून अधिक लोक ग्रामीण विभागात राहतात आणि त्यांच्यासाठी सर्वसमावेशक विकास, टिकाऊ शांतता आणि सर्वव्यापी उत्कर्ष साध्य करण्यासाठी या जनतेचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे.

जगभरातील सुमारे 70 टक्के लोक अत्यंत गरीब लोक खेड्यामध्ये राहतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पन्न मिळवण्याच्या गरजेतून ग्रामीण लोकसंख्या शहरी भागात स्थलांतर करीत आहे. चांगल्या संधीचा शोध घेण्याची धडपड करीत आहे, पण तिच्या वाट्याला निराशाच येत आहे. यामुळे शहरातील गरिबीमध्ये भर पडते आणि समाजात विषमतेची दरी, संघर्ष निर्माण होतो. ग्रामीण भागात शहरी सोयी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट अशा टिकाऊ विकास यंत्रणेद्वारे करावयाचे आहे. त्यातून तीन प्रकारच्या जोडण्या निर्माण कराव्या लागतील. एक प्रत्यक्षातील म्हणजे फिजिकल दुसरी इलेक्ट्रानिक आणि तिसरी ज्ञानाची. यातून आर्थिक जोडणी निर्माण होईल. गावांचे परस्परांशी आणि शहरांशी उत्तम रस्त्यांद्वारे आणि आवश्यक तेथे रेल्वेमार्गानी दळणवळण प्रस्थापित झाले पाहिजे. खेड्यांना शाळा, महाविद्यालये, इस्पितळे या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. ही झाली फिजिकल कनेक्टिव्हिटी. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या अद्ययावत साधनांद्वारे स्थानिक ज्ञानपरंपरेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. गावांना उत्तम शिक्षकांकडून उत्तम शिक्षण मिळवण्याबरोबरच चांगली वैद्यकीय सेवा, कृषी, मत्स्यव्यवसाय, फलोज्ञान याबाबतची नवनवी माहिती खेड्यात उपलब्ध झाली पाहिजे. ही झाली इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी, एकदा या दोन जोडण्या अस्तित्वात आल्या की, नॉलेज कनेक्टिव्हिटी अमलात आणली जाऊ शकेल.

हे सर्व करण्यासाठी नेतृत्वाजवळ निर्णय घेण्याचे धाडस असले पाहिजे. उमदे व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार आणि कामाची सचोटी असली पाहिजे. ग्लोबल व्हिजन 2030 मध्ये प्रदूषणविरहित स्वच्छ पर्यावरण, गरिबीशिवाय उत्कर्ष, युद्धाच्या भीतीपासून मुक्त शांतता आणि जगभरातील सर्व नागरिकांना राहण्यासाठी हे जग एक सुखाचे ठिकाण बनणे अभिप्रेत आहे.

डॉ. अब्दुल कलाम यांनी जगाला केलेले हे मार्गदर्शनीक विचार जगाने कृतीत आणले, तर ही पृथ्वी मानवासाठी सुखाचे नंदनवन ठरेल आणि मग मानवजातीला पळपुटेपणाने पृथ्वीसोडून नव्या परग्रहावर जागा शोधण्याची काही गरजच भासणार नाही.

– विजय य. सामंत
9819960303