पृथ्वीच्या वयात आम्ही दहा टक्केही खेळू शकत नव्हतो – विराट

0

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार एन्ट्री करणाऱ्या पृथ्वी शॉ याच्यावर सध्या सर्वच बाजूंनी कौतुक होत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यानंतर आता कर्णधार विराट कोहली यानंही पृथ्वीची स्तुती केली आहे. ‘पृथ्वीच्या वयाचे असताना आम्ही त्यांच्या दहा टक्केही खेळू शकत नव्हतो,’ असं विराटनं म्हटलंय. विराटनं दिलेली ही प्रतिक्रिया पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

हैदराबाद येथील कसोटी विजयानंतर विराट पत्रकारांशी बोलत होता. पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पृथ्वीनं दुसऱ्या सामन्यात अर्धशतक करत सातत्य कायम राखलं. विराटनं त्यांच्या या कामगिरीचं कौतुक केलं. ‘पृथ्वी हा अत्यंत धाडसी फलंदाज आहे. १८-१९ व्या वर्षी तो जे करतोय, ते आम्हालाही जमलं नव्हतं. मिळालेल्या संधीचं त्यानं सोनं केलंय. पृथ्वीसारखा खेळाडू संघात असणं खूप गरजेचं आहे, असंही विराट म्हणाला. ‘पृथ्वी बेधडक फलंदाज असला तरी बेजबाबदार नाही. त्याला स्वत:च्या खेळावर पूर्ण विश्वास असून पाहणाऱ्याला वाटतं की बॅटची कड लागून तो लवकरच बाद होईल. पण पृथ्वी ती चूक करत नाही. त्याला आम्ही नेटमध्ये प्रॅक्टिस करतानाही पाहिलंय. तो आक्रमक आहे. स्वत:वर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. हा त्याच्या गुणवत्तेचा पुरावा आहे. त्याच्या याच वैशिष्ट्यामुळं नव्या चेंडूवर उत्तम खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याचं नाव घ्यावं लागेल,’ असंही विराटने सांगितलं.